esakal | बिबट,अस्वल सफारीचे उद्‌घाटन पाच सप्टेंबरला
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

बिबट,अस्वल सफारीचे उद्‌घाटन पाच सप्टेंबरला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयांमधील बिबट आणि अस्वल सफारीचे उद्‌घाटन पाच सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. गणेशोत्सवाचा मुहूर्त साधून ही तारीख निश्‍चित केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वाघ आणि तृणभक्षक सफारीचे लोकार्पण डिसेंबर महिन्यातील हिवाळी अधिवेशनात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सर्वच सफारी इंडियन सफारीचा भाग आहे.
गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील इंडियन सफारी 112 हेक्‍टरमध्ये विकसित करण्यात येत आहे. इंडियन सफारीतील बिबट आणि अस्वल सफारीचे काम अंतिम टप्प्यात आहे. पहिल्या टप्प्यात पर्यटकांसाठी बिबट व अस्वल सफारी तसेच वाघ आणि तृणभक्षक सफारी सुरू करण्याचे निश्‍चित केले होते. मात्र, अद्याप त्याचे काम अपूर्ण आहे. विधानसभा निवडणुका लक्षात घेता पहिल्या टप्प्यातील दोन सफारीच्या लोकार्पणावर भर दिला जात आहे. 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. दोन्ही सफारीच्या कामावर शेवटचा हात फिरवणे सुरू आहे. असे असताना इंडियन सफारीतील उर्वरित दोन सफारी डिसेंबर महिन्यातील हिवाळी अधिवेशनात सुरू करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील सफारीची सुविधा 564 हेक्‍टर क्षेत्रात होणार आहे. यात इंडियन सफारी, आफ्रिकन सफारी, बायोपार्क, नाईट सफारी आणि बर्ड पार्क विकसित करण्यात येणार आहे. बांधा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यात येईल. त्यासाठी एफडीसीएम एस्सेल वर्ल्ड गोरेवाडा झू प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना केली आहे. हा प्रकल्प 452 कोटींचा आहे. त्यातील 200 कोटींचा वाटा राज्य सरकारचा तर उर्वरित 252 कोटींचा वाटा एस्सेल वर्ल्डचा राहील. आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय मध्य भारतासह देशातील प्रमुख केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. यामुळे भविष्यात वन्यप्राणी पाहण्यासाठी सिंगापूर येथे जाण्याची गरज भासणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबाझरी इको पार्कच्या उद्‌घाटनप्रसंगी सांगितले. त्यामुळे विदर्भच नव्हे तर मध्य भारतातील नागरिकांसाठी उत्तम पर्यटनस्थळ म्हणून याकडे पाहिले जात आहे.

loading image
go to top