"बिबी' हो तो ऐसी! मृताच्या कुटुंबाला देणार तीन हजार रुपये अन्‌ पाणी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

 

  •  
  • मृताच्या कुटुंबाला देणार आर्थिक मदत 
  • चंद्रपूर जिल्ह्यातील "स्मार्ट ग्रामपंचायत'चा ठराव 
  • समाजाभिमूख आणि आदर्शवत निर्णय 
  • दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न 

गडचांदूर (जि. चंद्रपूर) : मृत्यूच्या कवेत विसावलेल्या व्यक्तीची परत कधीच भेठगाठ होणे नाही. त्यामुळेच मृत्यू हा वेदनादायक अन्‌ दु:खद असतो. जाणारा जातो, मात्र त्याच्या मागे असलेल्या कुटुंबीयांच्या दु:खाला सीमा नसते. अशा बिकट समयी मदतीला आलेला हात लाखमोलाचा असतो. तिरडीचा भार वाहण्यासाठी असाच एक "स्मार्ट' खांदा कोरपणा तालुक्‍यातील बिबी गावातून सरसावला आहे. गावातील मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना तत्काळ तीन हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय चंद्रपूर जिल्ह्यातील "स्मार्ट ग्रामपंचायत' असलेल्या बिबीने घेतला आहे. 

एक आदर्शवत निर्णय 

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्‍यात येणाऱ्या "स्मार्ट ग्रामपंचायत' बिबीने घेतलेल्या समाजाभिमूख तसेच इतरांसाठी आदर्शवत निर्णयाची चर्चा सध्या तालुक्‍यात होत आहे. गावातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना अंत्यविधीसाठी त्वरित तीन हजार रुपये देणार, असा महत्त्वपूर्ण निर्णय बिबी ग्रामपंचायतीने ग्रामसभेत घेतला. सोबतच ग्रामपंचायतच्या वतीने सुरू असलेल्या शुद्ध व थंड पाण्याच्या एटीएममधून विनामूल्य पाणी मृताच्या कुटुंबीयांना दिले जाणार आहे. 

सर्वस्तरातून कौतुक 

अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांवर आधीच दु:खाचा डोंगर कोसळलेला असतो. त्यात आर्थिक स्थिती बेताची असलेल्या कुटुंबीयांवर अंत्यविधीचे साहित्य खरेदी करायलाही वेळेवर पैसे नसतात. पैशांसाठी त्यांना हात पसरावे लागते. अशा बिकट समयी अल्पशी मदतसुद्धा त्या कुटुंबासाठी लाखमोलाची ठरते. त्यामुळे ग्रामपंचायत बिबीने घेतलेल्या निर्णयाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे. 

पाच गावांचा समावेश 

बिबी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या बिबी, धामणगाव, नैतामगुडा, आसन (बु.) आणि गेडामगुडा या पाचही गावांमधील कुटुंबांना या योजनेंतर्गत मदत देण्यात येणार असल्याचे उपसरपंच आशीष देरकर यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Bibi 'ho ho Aisi! Three thousand rupees and water will be given to the family of the deceased