शहिदांना अनोखी श्रद्धांजली! सायकलने महाराष्ट्र भ्रमण

मुनेश्‍वर कुकडे
Monday, 28 September 2020

शहीद वीर जवानांना श्रद्धांजली देण्याकरिता व तरुणांच्या मनात आपल्या देशातील सैनिकांच्याप्रती सन्मान जागविण्याकरिता सायकलने महाराष्ट्र भ्रमण करीत असलेले अजित दळवी आज, सोमवारी अर्जुनी मोरगाव येथे येऊन पोहोचले.

अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) : अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त,
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात!
देशासाठी अनेक वीर प्राणांचे बलिदान देत असतात. दहशतवाद, नक्षलवाद आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी सैनिक डोळ्यात तेल घालून जागरुक असतात म्हणूनच आपण आपल्या कुटुंबाबरोबर सुखाने राहतो. देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांची नावेही पुढे विस्मरणात जातात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोल्हापूरच्या एका देशभक्ताने एक अनोखी युक्ती लढवली.  शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता ते सायकलने महाराष्ट्र भ्रमण करीत आहेत.

शहीद वीर जवानांना श्रद्धांजली देण्याकरिता व तरुणांच्या मनात आपल्या देशातील सैनिकांच्याप्रती सन्मान जागविण्याकरिता सायकलने महाराष्ट्र भ्रमण करीत असलेले अजित दळवी आज, सोमवारी अर्जुनी मोरगाव येथे येऊन पोहोचले.

अजित दळवी यांच्या येण्याची सूचना मिळताच येथील पूर्व सैनिक सेवा परिषदेचे सदस्य महाराणा प्रताप चौक येथे पोहोचले. त्यांना पंचायत समिती आवारात असलेल्या हुतात्मा स्मारकात घेऊन आलेत. तिथे त्यांना शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी दळवी यांनी हुतात्मा स्मारक येथे पुष्पगुच्छ अर्पण करून शहिदांना श्रद्धांजली वाहिली.

अजित दळवी हे कोल्हापुरातील एका बिल्डर कंपनीमध्ये वेल्डर वर्कर म्हणून काम करतात. सीमेवर लढत असलेले सैनिक आम्ही सुरक्षित राहावे म्हणून शत्रूशी दोन हात करतात. जीवही गमावतात. त्यामुळे अशा वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्याकरिता आपण काहीतरी करावे, असा विचार चार वर्षांपूर्वी त्यांच्या मनात आला. त्यांनी महाराष्ट्रातील संपूर्ण ३६ जिल्हे टप्प्याटप्प्याने सायकलने पिंजून काढण्याचे ठरविले.

सविस्तर वाचा -  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवावर यंदा कोरोनाचं सावट; स्थानिक प्रशासनाच्या सूचनांची प्रतीक्षा

संपूर्ण महाराष्ट्र सायकलने प्रवास करून ४ हजार किलोमीटर पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. अर्जुनी मोरगाव येथे भेट देऊन ते गडचिरोलीला सायकलने रवाना झाले. यावेळी प्रभाकर पुस्तोडे, सुनील फुल्लुके, देवराम पुस्तोडे, तलाठी प्रकाश कापगते, संजय राव, योगेश शहारे प्रामुख्याने उपस्थित होते.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bicycle tour of Maharashtra