हवा के साथ साथ, ओ साथी चल! आता हवेवर धावणार "बाइक'

श्रीनाथ वानखडे
Wednesday, 16 September 2020

सध्या पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत, शिवाय वाहनांच्या धुरामुळे प्रदूषण होते ते वेगळेच. या दोन्हींवर उपाय काढत पारंपरिक ऊर्जास्रोताचा वापर करून सिपनाच्या विद्यार्थ्यांनी हायब्रीड इंजिनचा वापर करीत इथेनॉल, सौरऊर्जा व पवनऊर्जेचा वापर करीत अनोखे संशोधन केलेले आहे.

मांजरखेड कसबा, (जि. अमरावती) : आतापर्यंत आपण बाइक केवळ पेट्रोल, डिझेलवर चालताना पाहिली, पण लवकरच हवेवर चालणारी गाडी दिसली तर आश्‍चर्य वाटायला नको. या गाडीमध्ये पेट्रोल, इथेनॉल, सौरऊर्जेसह पवनऊर्जेचा पर्याय राहणार आहे. गरजेनुसार कुठलाही पर्याय असल्याने ही गाडी हवेवरसुद्धा धावणार आहे. नुकतेच अमरावतीमधील सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी यासंदर्भातील पेटंट रजिस्टर केलेले आहे.

सध्या पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत, शिवाय वाहनांच्या धुरामुळे प्रदूषण होते ते वेगळेच. या दोन्हींवर उपाय काढत पारंपरिक ऊर्जास्रोताचा वापर करून सिपनाच्या विद्यार्थ्यांनी हायब्रीड इंजिनचा वापर करीत इथेनॉल, सौरऊर्जा व पवनऊर्जेचा वापर करीत अनोखे संशोधन केलेले आहे. या बाइक्‍सच्या मागील व पुढील चाकात इलेक्‍ट्रिक हब मोटरचा वापर होणार आहे. उंच व कठीण वाटेवर गाडीची क्षमता वाढावी म्हणून दोन्ही हबचा एकत्रित उपयोग मोलाचा ठरणार आहे. शिवाय गाडीचे ब्रेक दाबल्यावर कायनेटिक एनर्जीचे रूपांतर इलेक्‍ट्रिक एनर्जीमध्ये होणार आहे.

या गाडीमध्ये ड्युअल बॅटरीचा वापर करण्यात येणार असून मागील भागावर सौरपॅनल व पुढील भागात पवनऊर्जेचा वापर होणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही माध्यमातून निर्माण होणारी ऊर्जा लिथियम बॅटरीमध्ये स्टोअर होईल. म्हणजे चांगल्या रस्त्यावर ही गाडी वातावरणातील पवनऊर्जेचे रूपांतर इलेक्‍ट्रिक ऊर्जेत करणार असल्याने एकप्रकारे ही बाइक केवळ हवेवर चालणार आहे. कदाचित एकाच गाडीत अनेक इंधनाचा वापर करणारी व कमी खर्चात सर्वांत जास्त अंतर पार करणारी ही पहिली बाइक ठरू शकेल.

सविस्तर वाचा - आहे की नाही चमत्कार! हात न लावताच वाजते इथली घंटा

गुणवत्तेला हवी सहकार्याची जोड
आपल्या अफाट कल्पनाशक्तीच्या जोरावर सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयातील राहुल गवई, कोमल कोवळे, निमेश बाहेती, प्रसन्न इसाने, प्रथमेश इंगळे, कृतिका यादव यांनी टीमवर्कद्वारे या गाडीचे डिझाईन तयार करून पेटंट रजिस्टर केले आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bike on air is a new invention of engineering students