वनसंवर्धनामुळे जैवसाखळी झाली पुनर्जीवित!

सुनील सूर्यवंशी  
मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019

साठ हजार हेक्‍टरवर वन
नवापूर तालुक्‍यातील नंदुरबार, नवापूर, चिंचपाडा, खांडबारा वनक्षेत्रात सुमारे साठ हजार हेक्‍टर वनजमीन क्षेत्राच्या संवर्धनासाठी वन कर्मचाऱ्यांसह सुमारे शंभर संयुक्त वनव्यवस्थापन समितींनी चांगले काम केल्याने या जंगलामध्ये स्थानिक गवताच्या प्रजाती मारवेल, पाहुण्या, सेड्या, हिमेटा, कुसळ, रोसा वाढल्या आहेत. 

तळोदा (जि. नंदुरबार) -  जंगलसंवर्धनासाठी सरकारच्या योजना सर्वत्र राबविल्या जात असल्या तरी त्याचे दृश्‍य परिणाम मात्र अल्प प्रमाणावर दिसून येतात. जंगलक्षेत्रात झालेली किंचित वाढ हेच काय त्याचे फलित. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर वनक्षेत्रात मात्र वनसंवर्धनामुळे वाढलेले राखीव कुरण आणि विविध गवताचे प्रकार, त्यावर गुजराणसाठी आलेले व आजपर्यंत न दिसलेले काळवीट, हरीण आणि त्यावर जगणारे वाघ, बिबट्या आदी प्राण्यांचे अस्तित्व म्हणजे या भागात जैवसाखळी पुनर्जिवित झाल्याचे लक्षण आहे. वन विभाग आणि स्थानिक ग्रामस्थांचे हे मोठे यश आहे.

नंदुरबार वन विभागांतर्गत चिंचपाडा, नंदुरबार, नवापूर, खांडबारा या विभागांपैकी चिंचपाडा वनक्षेत्रातांतर्गत येणाऱ्या भागात गेल्या वर्षी पट्टेदार वाघ आढळला होता. या भागात वन्यप्राणी इतक्‍या वर्षांनंतर अचानक कसा प्रगटला, याबाबत तर्क लावले गेले. आता मात्र या भागात हरणांचा मोठा कळप दिसून आला. या भागातील नागरिकांसाठी हा सुखद आणि आश्‍चर्याचा धक्का होता. त्यामुळेच या भागात पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याचे दिसून येते.

या भागात गवताची मोठी वाढ झाल्यानेच काळवीट, हरणांची संख्या वाढली आहे. या प्राण्यांची शिकार करून वाघ आपली गुजराण करतो. हे प्राणी जंगलाबाहेर जाऊ नये, त्यांची अन्नसाखळी तुटू नये, यासाठी वन विभागाकडून कुरण विकास योजना राबविण्यात आली. 

गॅसवाटपामुळे तोडीला आळा
नवापूर वनक्षेत्रात विविध योजनांतर्गत घरगुती गॅसचे वाटप करण्यात आले, त्यामुळे आपोआपच जंगलतोडीला आळा बसला. त्यातून जंगलांचे संवर्धन होत कुरणे विकसित होत गेली. वन्यजीव जंगलामध्ये सुरक्षित राहावे, यासाठी सर्वप्रथम जंगलातील अन्नसाखळी वाढविणे गरजेचे आहे.

साठ हजार हेक्‍टरवर वन
नवापूर तालुक्‍यातील नंदुरबार, नवापूर, चिंचपाडा, खांडबारा वनक्षेत्रात सुमारे साठ हजार हेक्‍टर वनजमीन क्षेत्राच्या संवर्धनासाठी वन कर्मचाऱ्यांसह सुमारे शंभर संयुक्त वनव्यवस्थापन समितींनी चांगले काम केल्याने या जंगलामध्ये स्थानिक गवताच्या प्रजाती मारवेल, पाहुण्या, सेड्या, हिमेटा, कुसळ, रोसा वाढल्या आहेत. 

नंदुरबार वनक्षेत्रात हरीण व तृणभक्षक वन्यजीव आढळून आले आहेत. या वन्यजीवांसाठी गवत व वनक्षेत्रात पाणवठे आहेत. मानवी हस्तक्षेप नसल्याने जैवसाखळी पुनर्जिवित होत आहे. वन्यजिवांचे संवर्धन व सुरक्षिततेसाठी आम्ही प्रयत्नशील आहे.
- गणेश रणदिवे, उपवनसंरक्षक, नंदुरबार.

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bio-chain revived due to forest conservation