सात ठिकाणांना जैवविविधता वारसास्थळांचा दर्जा 

राजेश रामपूरकर 
सोमवार, 22 मे 2017

नागपूर - महाराष्ट्रातील सात ठिकाणांना जैवविविधता वारसास्थळांचा दर्जा दिला जाण्याची शक्‍यता आहे. सातही प्रस्ताव महाराष्ट्र जैवविविधता मंडळाला प्राप्त झाले असून २४ मे रोजी  मुंबई येथे होणाऱ्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्बत होण्याची शक्‍यता व्यक्त  केली जात आहे.  

नागपूर - महाराष्ट्रातील सात ठिकाणांना जैवविविधता वारसास्थळांचा दर्जा दिला जाण्याची शक्‍यता आहे. सातही प्रस्ताव महाराष्ट्र जैवविविधता मंडळाला प्राप्त झाले असून २४ मे रोजी  मुंबई येथे होणाऱ्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्बत होण्याची शक्‍यता व्यक्त  केली जात आहे.  

महाराष्ट्रातील कासवांच्या अधिवासासाठी प्रसिद्ध असलेले वेळास व आंजर्ला (जि. रत्नागिरी) तर स्थलांतरित पक्ष्यांचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे मेहरुण व लांडोरखोरी तलाव (जि. जळगाव), हाजरा फॉल (जि. गोंदिया), गणेश खिंड (जि. पुणे), वडधाम येथील जीवाश्‍म (जि. गडचिरोली) या सात ठिकाणांना जैवविविधता वारसास्थळांचा दर्जा मिळण्यासाठी प्रस्ताव महाराष्ट्र जैवविविधता मंडळाकडे प्राप्त झालेले आहेत. त्याची तपासणी झाली असून २४ तारखेच्या  बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा होणार आहे. त्यानंतर ते राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. 

लोकसहभागातून स्थानिक जैविक विविधतेचे संरक्षण व संवर्धन व पारंपरिक गोष्टींचे जतन करण्यासाठी जैवविविधता कायदा २००२ कायद्यान्वये संबंधित ठिकाण ‘जैवविविधता वारसास्थळ’ जाहीर केले जाते. जैवविविधता वारसास्थळ होण्यासाठी संबंधित गावच्या ग्रामसभेत ठराव मंजूर करावा लागतो. अशाप्रकारचे पाच ठराव ग्रामसभांनी मंडळाकडे पाठवले आहेत. मंडळाने त्याची तपासणी केली असून जैवविविधता मंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा करून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी त्याची शिफारस केली जाईल. यापूर्वी गडचिरोलीतील सागवानाच्या वृक्षांकरिता प्रसिद्ध असलेल्या ग्लोरी ऑफ आलापल्लीला ‘जैविक वारसा क्षेत्र’ म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. 

२८ फेब्रुवारीला नवीन सदस्यांची नेमणूक झाली आहे. त्यानंतर आता बैठक होत आहे. यापूर्वीची बैठक ९ नोव्हेंबर २०१४ रोजी घेण्यात आलेली होती. प्रत्येक जिल्ह्यात एक ते दोन  जैवविविधता क्षेत्राची ओळख करून तसे प्रस्ताव जैवविविधता मंडळाकडे पाठविण्याच्या सूचना केलेल्या होत्या. मात्र, अद्याप त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती पुढे आली  आहे. 

तळी, सरोवर, नद्यांचा उगम, प्राण्यांचे भ्रमणमार्ग, गवताळ कुरणे, दुर्मिळ, औषधी वनस्पतींची ठिकाणे, पिकांच्या रानटी प्रजाती आदी ठिकाणांचा जैविक विविधता वारसास्थळ म्हणून समावेश होऊ शकतो. सदर वारसास्थळांचे जतन करण्याकरिता ग्रामस्थांच्या माध्यमातून नियमावली तयार होऊ शकते. लोकसहभागातून जैविक विविधतेचा शाश्‍वत पद्धतीने वापर केल्यास त्यातून आर्थिक उत्पन्न मिळू शकते
- विनयकुमार सिन्हा, सदस्य सचिव,  महाराष्ट्र जैवविविधता मंडळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Biodiversity heritage status in seven places