esakal | रेशन दुकानदारांमुळे कोरोनाचा दुप्पट धोका; बायोमेट्रिक ठरू शकते घातक
sakal

बोलून बातमी शोधा

Biometric at ration shops are dangerous

यात कोणी दुकानदार किंवा लाभार्थी यांना कोरोनाची लागण असल्यास पूर्ण शहर व गावभर कोरोनाची लागण होण्याची गंभीर बाब पुढे येऊ शकते. त्यामुळे प्रशासनाला ही परिस्थिती हाताळणे अंगाबाहेर जाईल, असे चित्र दिसत आहे.

रेशन दुकानदारांमुळे कोरोनाचा दुप्पट धोका; बायोमेट्रिक ठरू शकते घातक

sakal_logo
By
प्रशांत झिमटे

आरमोरी (जि. गडचिरोली)  : गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे, ही साखळी तुटावी म्हणून जिल्ह्यातील मुख्य शहरासह गावामध्ये जनता कर्फ्यू लावण्यात येत आहे. मात्र रेशन दुकानामध्ये असलेल्या बायोमेट्रिक मशीनमध्ये प्रत्येक कार्डधारकाचा अंगठा घेतल्याशिवाय धान्य देता येत नाही. त्यामुळे अनेक नागरिकांचा अंगठा बरोबर लागावा म्हणून रेशन दुकानदाराला त्यांचा हात पकडून अंगठा घ्यावा लागतो. यात दुकानदार व कार्डधारक लाभार्थीमध्ये अंतर ठेवणे कठीण आहे. 

यात कोणी दुकानदार किंवा लाभार्थी यांना कोरोनाची लागण असल्यास पूर्ण शहर व गावभर कोरोनाची लागण होण्याची गंभीर बाब पुढे येऊ शकते. त्यामुळे प्रशासनाला ही परिस्थिती हाताळणे अंगाबाहेर जाईल, असे चित्र दिसत आहे. गडचिरोली जिल्ह्यात दवाखाने, डॉक्‍टरची संख्या अत्यल्प आहे. यात रेशन दुकांनामुळे कोराना रोगाचा प्रसार वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे यात प्रशासनाने गंभीर नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

हेही वाचा - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला

कोरोना एप्रिल, मे, जूनच्या लॉकडाउन काळात जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित नसतानासुद्धा रेशन दुकानदाराच्या अंगठ्याने धान्य देण्याचे शासनाने केले होते. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव गावागावात पोहोचला असल्यामुळे शासन जनजागृती करीत आहे की अंतर ठेवून आपले काम करावे, मात्र त्यात रेशन दुकान अपवाद ठरले आहेत. यात बायोमेट्रिक मशीनमध्ये अंगठा घेण्याकरिता दुकानदार व ग्राहकांमध्ये अंतर ठेवणे कठीण आहे. प्रत्येक लाभार्थ्यांचा दुकानदारांना अंगठा घेऊनच धान्य देण्याची प्रक्रिया आहे.

 त्यामुळे रेशन दुकानदारांमुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्‍यता बळावली आहे. याकडे लोकप्रतिनिधीचे व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. एकीकडे दुकाने बंद करून कोरोनाची साखळी तुटावी म्हणून प्रयत्न केले जात आहे. दर दुसरीकडे महिन्याला दोन वेळा धान्य वाटप केले जाते. त्यात केंद्र शासनाकडून मोफत धान्य व पैशाने खरेदी केलेले धान्य ,असे दोन वेळा धान्य वाटप करावे लागत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, वडसा, चामोर्शी, कुरखेडा तालुक्‍यातील जवळपास १५ दुकानदारांना कोरोची लागण झाल्याची माहिती आहे. त्यामुळे रेशन दुकानदार व लाभार्थीपासून कोरोनाचा धोका असल्याने याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी - घरात स्मार्ट टीव्ही वापरताय? तर आत्ताच व्हा सावध, अन्यथा येणार डोक्याला हात लावायची वेळ

शासनाकडे पाठपुरावा करणार

कोरोनाची साखळी तुटावी म्हणून शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र बायोमेट्रिक मशीमध्ये अंगठा घेण्याकरिता ग्राहक व रेशन दुकानदारांमध्ये जवळील संबंध येत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे ऑफलाइन धान्य देण्यात यावे, याकरिता प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे मत आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी मांडले.

संपादन - अथर्व महांकाळ