ऐकावे ते नवलच! म्हणे स्मशानभूमीत रंगली वाढदिवसाची ओली पार्टी आणि हवेत बंदुकीचा बारही

दीपक फुलबांधे
Friday, 4 September 2020

स्मशानभूमीत गुन्हेगारी जगतातील अनेक गुन्हेगार खरबीच्या स्मशानभूमीत एका सहकाऱ्याचा वाढदिवस साजरा करण्यास जमले होते. दरम्यान, गावठी बंदुकीतून हवेत गोळ्या झाडल्याने त्याबाबत गावकऱ्यांना माहिती मिळाली. त्यांनी पोलिसांना सूचना दिली.

मोहाडी (भंडारा) : वाढदिवस साजरा करण्यासाठी गुन्हेगारांनी कुठले ठिकाण निवडले असावे? त्यांनी निवड केली स्मशानभुमीची. खरबी येथे स्मशानभूमीत बुधवारी दुपारी तुमसर, मोहाडी गोंदिया व नागपूर येथील काही गुन्हेगारांची ओली पार्टी व वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी गावठी बंदुकीतून हवेत सहा गोळ्या झाडल्या. गोळीबाराच्या आवाजाने घाबरलेल्या गावकऱ्यांनी मोहाडी पोलिसांना माहिती दिली. पोलिस लगेच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचे वाहन दिसताच पार्टीतील सर्व पळून गेले. या भागात एकाचा खून झाल्याची चर्चा परिसरात सुरू असली तरी, पोलिसांना अद्यापही त्याबाबत कोणताही सुगावा लागला नाही.

स्मशानभूमीत गुन्हेगारी जगतातील अनेक गुन्हेगार खरबीच्या स्मशानभूमीत एका सहकाऱ्याचा वाढदिवस साजरा करण्यास जमले होते. दरम्यान, गावठी बंदुकीतून हवेत गोळ्या झाडल्याने त्याबाबत गावकऱ्यांना माहिती मिळाली. त्यांनी पोलिसांना सूचना दिली.

पोलिस उपनिरीक्षक थेरे आपल्या ताफ्यासह त्याठिकाणी पोहचले. परंतु, पोलिसांचे वाहन पाहून जमलेले पसार झाले. त्यातील एक जण पोलिसांच्या हाती लागला. त्याला ताब्यात घेतले.
मात्र, परिसरात खून झाल्याची अफवा खरबी व मोहाडी येथे रंगली आहे. त्याबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता तेच विचारणाऱ्यांची चौकशी करीत आहेत. मात्र, पोलिसही गुन्हेगारांची पाठराखण करीत असल्याचा संशय निर्माण होत आहे.

पाच जणांना अटक, नाव गुप्त
खरबी स्मशानभूमीत झालेल्या गुंडांच्या ओल्या पार्टीत सहभागी असलेल्या पाच जणांना मोहाडी पोलिसांनी अटक केली असून यातील दोन नागपूरचे, दोघे गोंदियाचे आणि एक आरोपी तुमसर येथील असल्याची माहिती मिळाली आहे आज पोलिस उपविभागीय अधिकारी रीना जनबंधू येथे आल्या. अटकेत असलेल्यांची पोलिसी भाषेत विचारपूस सुरू असल्याची माहिती आहे.

सविस्तर वाचा - तुम्हीच सांगा नेमके कोणाच्या आदेशाचे पालन करावे; का विचारत आहे शिक्षक हा सवाल?

ही ओली पार्टी नेमकी कशासाठी आयोजित केली होती. याबाबत पोलिसही गोपनीयता पाळत आहेत. पार्टीत हवेत गोळ्या झाडण्यात आल्या. ती बंदूक व झाडलेल्या गोळ्या पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.
मात्र, या घटनेमुळे मोहाडी परिसरात अफवांचा बाजार असून चर्चेला उधाण आले आहे.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Birthday Party in Cemetery