भाजप घेणार नगरसेवकांची झाडाझडती

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 October 2019

नागपूर : विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने भाजपमधील वरिष्ठ नेत्यांत नाराजीचा सूर आहे. गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासकामे करूनही मताधिक्‍यात वाढ होण्याऐवजी घट झाली. काही मोजके नगरसेवक अपवाद वगळता अनेकांनी निवडणूक गांभीर्याने न घेतल्याचा हा परिणाम असल्याचा निष्कर्ष काही वरिष्ठ नेत्यांनी काढला आहे. त्यामुळे अशा नगरसेवकांची झाडाझडती घेण्यात येणार असल्याचे सूत्राने नमूद केले. वरिष्ठ नेत्यांनी नगरसेवकांकडून बूथनिहाय याद्याही मागितल्या असल्याचेही समजते. 

गेल्या पाच वर्षांत राज्य सरकारने अनेक जनहितार्थ योजना नागरिकांसाठी लागू केल्या. शहरात हजारो झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप करण्यात आले. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल योजना राबवून नागरिकांना लॉटरी पद्धतीने घरेही देण्यात आली. महापालिकेत ऐवजदारांना स्थायी करण्याचाही निर्णय घेतला. एवढेच शहरात 'डीपीसी'च्या निधीतून कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली. अनेक नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील विकासकामांसाठी डीपीसी निधी देण्यात आला. मात्र, विधानसभा निवडणुकीत या सर्व योजना, प्रकल्प व विकासकामांसाठी दिलेल्या निधीचा भाजपला काहीही फायदा झाला नसल्याचे मतांच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले. उलट 2014 मधील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मताधिक्‍यात घट झाली. पाच वर्षांपूर्वी 2014 मध्ये भाजपलाही सहाही मतदारसंघातं यशासह 5 लाख 37 हजार 208 मते पडली होती. या निवडणुकीच्या तुलनेत 20 हजार मतांची घट झाली. त्यामुळे सारेच भाजप नेते अवाक्‌ झाले आहेत. सहाही मतदारसंघांतील निवडणुकीची जबाबदारी तेथील नगरसेवकांवर देण्यात आली होती. परंतु, काही नगरसेवकांचा अपवाद वगळता अनेक नगरसेवकांनी विजयाला गृहीत धरले. त्यामुळे त्यांनी राज्य सरकारच्या योजना, उपक्रम, प्रकल्प, विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविण्यात दिरंगाई केल्याचा निष्कर्ष काही भाजप नेत्यांनी काढला आहे. त्यामुळे आता नगरसेवकांकडून बूथनिहाय याद्या मागविण्यात आल्या असल्याचे सूत्राने नमूद केले. कुठल्या बूथवर भाजपला मतदान करणारे किती?, प्रत्यक्ष मतदान झाले किती? या सर्व बाबींवरून नगरसेवकांची झाडाझडती घेणार असल्याचे समजते. त्यामुळे निवडणुकीला गांभार्याने न घेणाऱ्या नगरसेवकांच्या अडचणी वाढणार आहेत. 
नगरसेवकांच्या कामांचे मूल्यांकन करणार 
शहरातील काही नगरसेवकांनी पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार बैठकी घेतल्या, रॅली काढली. मात्र, काही नगरसेवकांनी केवळ या रॅली, बैठकीत उपस्थिती दर्शविली. त्यामुळे प्रचारादरम्यान कुठल्या नगरसेवकांनी काय काम केले, त्यात त्याला किती यश आले? आदीचे मूल्यांकन केले जाणार असल्याचेही सूत्राने नमूद केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp, assembly election