विदर्भात चारही महापौर भाजपचे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 November 2019

बहुमतापेक्षा जास्त सदस्यसंख्या असल्याने विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, नागपूर आणि अकोला या चारही महानगरपालिकांवर भारतीय जनता पक्षाचे महापौर म्हणून निवडून आले आहेत.

नागपूर : विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, नागपूर आणि अकोला या चारही महानगरपालिकांवर भाजपचे महापौर म्हणून निवडून आले आहेत. राज्यात निर्माण झालेल्या नव्या राजकीय समीकरणामुळे शिवसेनेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली; तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने केवळ औपचारिकता म्हणून निवडणुकीत सहभाग घेतला.

अमरावतीचे महापौर चेतन गावंडे

अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे चेतन गावंडे तर उपमहापौरपदी कुसुम साहू यांनी विजय मिळविला. या दोघांनाही प्रत्येकी 49 मते मिळाली. शिवसेनेने तटस्थ राहत मतदानात भाग घेतला नाही, तर तीन सदस्य अनुपस्थित राहिले. महापौरपदासाठी कॉंग्रेसच्या विलास इंगोले व प्रदीप हिवसे यांनी माघार घेतल्याने निवडणुकीतील चुरस संपुष्टात आली. पक्षांतर्गत उफाळलेला असंतोष व विरोधकांनी खेळलेली खेळी यावर मात करीत दोन्ही पदे जिंकल्याचा जोरदार जल्लोष भाजप कार्यकर्त्यांनी केला.

चंद्रपूर महापौरपदी भाजपच्या राखी कंचर्लावार

चंद्रपूर महापौरपदी भाजपच्या राखी कंचर्लावार यांची निवड झाली आहे. महानगरपालिकेच्या सभागृहात निवडणूक पार पडली. भाजपकडून राखी कंचर्लावार, तर कॉंग्रेसकडून कल्पना लहामगे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. यावेळी झालेल्या मतदानात कंचर्लावार यांना 42, तर लहामगे यांना 22 मते मिळाली. राखी कंचर्लावार या दुसऱ्यांदा महापौर झाल्या आहेत.

नागपूरच्या महापौरपदी संदीप जोशी

नागपूर महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपचे संदीप जोशी विजयी झाले आहेत. 53 वे महापौर म्हणून उद्या ते मावळत्या महापौर नंदा जिचकार यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील. त्यांना एकूण 104 मते मिळाली. उपमहापौर म्हणून मनीषा कोठे यांची निवड करण्यात आली असून त्यांनाही एवढीच मते मिळाली.

अकोल्याचे महापौर अर्चना मसने

अकोला महापालिकेत महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक शुक्रवारी दुपारी पार पडली. महापौरपदी भाजपच्या अर्चना जयंतराव मसने आणि उपमहापौरपदी राजेंद्र गिरी यांची निवड झाली. कॉंग्रेसने संख्याबळ नसतानाही निवडणूक लढविली. शिवसेना तटस्थ राहिली तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक अनुपस्थित राहिले.

पहिल्या अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर नव्याने पदाधिकाऱ्यांची निवडणूक घेण्यात आली. अकोला महापौरपद सर्वसाधारण महिलासाठी राखीव होते. महापौरपदासाठी भाजपच्या अर्चना मसने आणि कॉंग्रेस अजराबी नजरीन यांच्यात लढत झाली.

शिवसेना तटस्थ, राष्ट्रवादी गैरहजर

महापौर आणि उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे आठ सदस्य आणि एमआयएमचा एक सदस्य यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. राज्यातील बदलत्या सत्ता समीकरणाचा परिणाम येथे दिसून आला नाही. उलट राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही मित्रपक्ष कॉंग्रेसला साथ देण्याऐवजी त्यांचे पाचही नगरसेवक अनुपस्थित राहिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP has four mayors in Vidarbha