भाजप महानगराध्यक्षांचे अज्ञान; केंद्राचा रस्ता अन् राज्याविरोधात आंदोलन, काँग्रेसने घेतली ‘फिरकी’

BJP leader staged agitation against the government at Chandrapur
BJP leader staged agitation against the government at Chandrapur

चंद्रपूर : ज्या पक्षाची सत्ता त्या पक्षांचे कार्यकर्ते सरकार विरोधात रस्त्यावर सहसा उतरत नाही. भाजपचे महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी मात्र नवीन पायंडा पाडला. केंद्र सरकारच्या विरोधात त्यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकाऱ्यांनी धरणे दिले. ज्या रस्त्यासाठी धरणे दिले तो राष्ट्रीय महामार्ग आहे. त्यासाठी निधी, मंजुरी आणि कंत्राटदारांची नेमणूक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करते. डॉ. गुलवाडेंच्या अतिउत्साहामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना तोंडघशी पडावे लागले. दुसरीकडे या आंदोलनाच्या निमित्ताने कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष रामू तिवारी यांनी भाजप शहर अध्यक्षांच्या ‘धाडसाचे’चे कौतुक केले.

चंद्रपुरातील हॉटेल सिद्धार्थ ते बंगाली कॅम्पपर्यंत चौपदरी रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून रस्त्याचे काम थांबले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता जागोजागी खोदून ठेवला आहे. या रस्त्याचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे यासाठी भाजपचे शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात गुरवारी धरणे देण्यात आले. आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य बिरजू पाझारे, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, शीला चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येत भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावून त्यांनी राज्य सरकारचा निषेधही केला. मात्र या आंदोलनाची ‘फिरकी’ घेणारे प्रसिद्ध पत्रक शहर कॉंग्रेसने काढल्यानंतर भाजपचे आंदोलनकर्ते चांगलेच तोंडघशी पडले. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित येतो.

यासाठी मार्गदर्शक सूचना, निधी आणि कंत्राटदार नेमण्याच्या कामाला केंद्राकडून मंजुरी मिळते. फक्त राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होताना एजन्सी म्हणून राज्य सरकारचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जबाबदारी सोपविली जाते. ते फक्त देखभाल दुरुस्ती आणि अंदाजपत्रक तयार करण्याचे काम करतात.

देयकांना मंजुरी देण्याचे काम केंद्राचे

आधी हा रस्ता सिमेंट कॉंक्रिटचा होता. त्यानंतर डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला. या बदलात कंत्राटदाराचे देयक थकले. या देयकांना मंजुरी देण्याचे काम केंद्राचे आहे. याचा विसर भाजपच्या शहर अध्यक्षांना पडला आणि केंद्राच्या विरोधात त्यांनी धरणे दिले. त्यांच्या या ‘धाडसा’चे कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष रामू तिवारी यांनी कौतुक केले.

शेतकऱ्यांसाठी एखादे आंदोलन करा

आपल्या शासनाच्या विरोधात म्हणजेच पंतप्रधान मोंदी विरोधात आंदोलन करण्याची हिंमत डॉ. गुलवाडे आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दाखविले. आता शेतकऱ्यांसाठी त्यांनी असेच एखादे आंदोलन करावे, असे आवाहन तिवारी यांनी दिले. दुसरीकडे डॉ. मंगेश गुलवाडे मात्र शेवटपर्यंत हा रस्ता राज्य शासनाची जबाबदारी आहे, यावर ठाम होते.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com