‘मीच सभा घेणार...’वरून खडाजंगी!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

अकोला महानगरपालिकेत माजी महापौरांसह भाजप-शिवसेना नगरसेवक आले आमने-सामने

अकोला : महापालिका सभेत पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमधील वितुष्ट दिसून आले. शिवसेना गटनेते राजेश मिश्रा यांनी अमृत अभियानाच्या डीपीआरच्या विषयावरून माजी महापौर विजय अग्रवाल यांना उद्देशून आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शैलीत ‘मीच सभा घेणार...’ या मुद्यावरून डिचविण्याचा प्रयत्न केला. त्यावरून सभागृहात चांगलीच खडाजंगी झाली. शिवसेनेसोबत महाविकास आघाडीतील पक्षांचे नगरसेवक विरुद्ध भाजप नगरसेवक असे चित्र सभागृहात पहावयास मिळाले.

केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेतून भूमिगत गटार योजना राबविणे आणि हद्दवाढीतील भागात जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी डीपीआर तयार करण्याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला अनुक्रमे 2.64 कोटी आणि 50 लाख रुपये देण्याबाबतचा विषय सोमवारी महापालिका सभेत ठेवण्यात आला होता. यावर सर्वच नगरसेवकांनी आक्षेप घेतला. शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा यांनी पुन्हा एकदा जुने कामेच व्यवस्थित झाले नसताना पुन्हा मजीप्राला पैसे कशासाठी द्यायचे असा मुद्दा उपस्थित केला. ते सभागृहापुढे त्यांचे म्हणणे मांडत असताना माजी महापौर विजय अग्रवाल यांना उद्देशून ‘मीच सभा घेणार...’ असा आग्रह सत्ताधारी धरत असल्याचा उल्लेख केला. त्यावर माजी मुख्यमंत्र्यांची खिल्ली सभागृहात कुणालाही उडविता येणार नाही, असे अग्रवाल म्हणाले. त्यावर शिवसेनेच्या सदस्यांनी आमचा आवाज दाबू नका, हा लोकशाहीचा अपमान आहे, असे म्हणत महापौरांपुढील मोकळ्या जागेत सर्व शिवसेना नगरसेवक न नगरसेविका गोळा झाले. त्याला काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीही पाठिंबा दिला. अखेर भाजपचे नगरसेवकही पुढे. शाब्दिक चकमक सुरू असतानाच महापौर अर्चना मैसने यांनी विषय मंजूर करून घेत पुढील विषय घेतला.

हेही वाचा - साडेअकराशे लाचखोरांना ठोकल्या बेड्या

विषय बेकायदेशीर मंजूर!
सभागृहात चर्चा सुरू असताना कोणाचेही मत जाणून न घेता विषय मंजूर करणे बेकायदेशीर असल्याचे शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा म्हणाले. काँग्रेसचे डॉ.झिशान हुसेन यांनी चर्चा का टाळली जात आहे, याबाबत सत्ताधाऱ्यांना जाब विचारला. माजी महापौर विजय अग्रवाल यांनी सभागृहात कोणत्याही पक्षाच्या आमदार, मुख्यमंत्र्यांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, असे सांगितले. एमआयएमचे मो. मुस्तफा यांनीही या विषयावर आक्षेप घेतला.

अधिक वाचा -  अहो आश्चर्यम...माहिती द्या, नाहीतर तीन लाख खंडणी द्या! 

विजू-राजूच्या जोडीवर संशय
सभागृहात एखादा वादग्रस्त विषय मंजूर करून घ्यावयाचा असेल तर विजय अग्रवाल आणि शिवसेनेचे राजेश मिश्रा यांच्यातील वाद सभागृहात टोकाला जातो. या वादातच विषय मंजूर करून घेतला जातो व नंतर वातावरण निवळते. त्यामुळे महापालिकेतील विजू-राजूच्या जोडीवरच एमआयएमचे मो. मुस्तफा यांनी संशय घेतला. काँग्रेसचे इरफान यांनी विजय अग्रवाल यांनाच थेट महापौर कोण आहे, असा प्रश्‍न केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP-Shivsena corporator came face to face