मोदी लाटेतही भाजपच्या 49 जणांचे डिपॉजिट जप्त

राजेश प्रायकर @rajeshp_sakal
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

नागपूर ः मागील निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मतांसह आमदार निवडून आलेल्या भाजपच्या 49 उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले होते. विशेष म्हणजे लोकसभेतील यश तसेच नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर स्वार होऊनही या उमेदवारांना दारुण पराभव पत्करावा लागला. सत्तेत असलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीने वेगवेगळी चूल मांडली होती. त्यांच्या तीनशेवर उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले होते तर शिवसेनेचे 129 उमेदवारांनाही मानहानीजनक पराभवाला सामोरे जावे लागले होते.

नागपूर ः मागील निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मतांसह आमदार निवडून आलेल्या भाजपच्या 49 उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले होते. विशेष म्हणजे लोकसभेतील यश तसेच नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर स्वार होऊनही या उमेदवारांना दारुण पराभव पत्करावा लागला. सत्तेत असलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीने वेगवेगळी चूल मांडली होती. त्यांच्या तीनशेवर उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले होते तर शिवसेनेचे 129 उमेदवारांनाही मानहानीजनक पराभवाला सामोरे जावे लागले होते.

मागील 2014 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळवले. या विजयाच्या पार्श्‍वभूमीवर त्यानंतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठ्या विजयाचे इमले रचले. युतीला तिलांजली देत भाजपने 260 जागांवर उमेदवार उभे करीत सत्ताधारी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेपुढेही आव्हान उभे केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट, सत्ताधाऱ्यांविरोधातील वातावरण आदीचा फायदा घेत भाजपने मागील 2014 मधील निवडणुकीत 122 जागांवर यश मिळवित राज्यात सर्वांत मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या या पक्षाच्या 49 उमेदवारांना मात्र मानहानीजनक पराभव पत्करावा लागला. मोदी लाटेतही त्यांचे डिपॉजिट जप्त झाले. मात्र, भाजपने राज्यात सर्वाधिक 1 कोटी 47 लाख 9 हजार 287 मते घेतली. युती न झाल्याने एकाकी लढावे लागलेल्या शिवसेनेनेही 282 जागांवर उमेदवार उभे केले होते. यातील 63 उमेदवार विधानसभेचे विधीमंडळ गाठण्यात यशस्वी ठरले. सेनेच्या 129 उमेदवारांचे मात्र डिपॉजिट जप्त झाले. 1 कोटी 2 लाख 36 हजार 970 मते घेत शिवसेना भाजप पाठोपाठ मोठा पक्ष ठरला. मोदी नावाचे वादळ घोंगावत असतानाही कॉंग्रेस व राष्ट्रवादीने वेगवेगळे लढण्याचा आत्मघातकी निर्णय घेतला. त्याचा मोठा फटका या दोन्ही पक्षाला बसला. अवघ्या महिन्याभरापूर्वी सत्तेत असलेल्या कॉंग्रेसने मागील निवडणुकीत 287 जागा लढविल्या. यातील केवळ 42 जागांवर त्यांना विजय खेचून आणता आला. त्यांच्या 152 उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले. राष्ट्रवादीची स्थिती अशीच होती. त्यांनी 278 जागा लढविल्या, त्यांचे 41 सदस्य निवडून आले. 158 उमेदवारांना डिपॉजिटही वाचविणे शक्‍य झाले नाही.

बसप, मनसेची धुळधाण
विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या नेतृत्वामुळे मनसेकडून अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या. या पक्षाने राज्यात 219 उमेदवार उभे केले. मात्र, एकमेव आमदार निवडून आला. 209 जणांचे डिपॉजिट झाले. राष्ट्रीय पक्ष असलेल्या बसपने राज्यात 280 जागेवर उमेदवार उभे केले. मात्र, एकही आमदार निवडून आला नाहीच, शिवाय 275 जणांना डिपॉजिट गमवावे लागले.

एमआयएमची कासवगती
एमआयएमने पहिल्यांदाच राज्यात मागील विधानसभा निवडणूक लढविली. या पक्षाने राज्यात त्यांचा प्रभाव असलेल्या 24 जागांवर उमेदवार उभे केले. यातील 14 जणांचे डिपॉजिट जप्त झाले असले तरी त्यांचे दोन आमदार निवडून आले. एकूणच मनसेपेक्षाही बऱ्या स्थितीत असलेल्या एमआयएमने एकूण 4 लाख 89 हजार 614 मते घेतली होती.

अपक्षांनी लाटली 24 लाख मते
मागील निवडणुकीतही अपक्षांनी जोर लावला. राज्यात 1699 अपक्षांनी विधानसभा निवडणुकीत भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसारख्या पक्षांपुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. मात्र केवळ 16 अपक्षांना डिपॉजिट वाचविणे शक्‍य झाले. 1683 अपक्षांचे डिपॉजिट जप्त झाले. या सर्व अपक्षांनी राज्यात 24 लाख 93 हजार 152 मते घेतली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP's 49 people seized deposits in Modi wave