पुन्हा एकदा नमक का कानुन! मीठाच्या तुटवड्याची पसरतेय अफवा, किंमतीही दुप्पट

Black marketing of salt in Gadchiroli district
Black marketing of salt in Gadchiroli district

कोरची (जि. गडचिरोली) : लॉकडाउनमुळे मिठाच्या शेतात काम करणारे मजूर आपापल्या गावी निघून गेल्याने येत्या काही दिवसांत बाजारपेठेत मिठाचा तुटवडा जाणवेल अशा प्रकारची अफवा सर्वत्र पसरली आहे. त्यामुळे ग्राहकांनी किराणा सामानासोबतच चार-पाच महिने पुरेल एवढे मीठ खरेदी करणे सुरू केल्याने किराणा दुकानांतून मीठ गायब होत असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे.

कोरची तालुक्‍यात लॉकडाउनच्या अगोदर 25 किलो वजनाची मिठाची बॅग 160 रुपयांत विकली जात होती. आता हीच बॅग 300 रुपयांवर पोहोचली आहे. कोरची तालुक्‍याला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यामध्ये मिठाचा तुटवडा जाणवत असल्यामुळे तेथील शेकडो लोकांनी कोरची व ग्रामीण भागात राहात असलेल्या आपल्या नातेवाईकांना भ्रमणध्वनीवरून मीठ खरेदी करून ठेवण्याचा आग्रह केला आहे. या निरोपानंतर कोरची तालुक्‍यात गावागावांतील लोकांनी सर्व किराणा दुकानांतून मिठाच्या बॅग खरेदी केल्या. कमी किमतीत घेऊन त्या दुप्पट भावाने विक्री केल्या जात असल्याचेही प्रकार समोर आले आहेत. किराणा दुकानांत मिठाची चणचण जाणवत असल्याने शहरी भागात दहा रुपये किलोप्रमाणे मिळणाऱ्या पाकीटाची किंमत पन्नास रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यावर तोडगा काढून किराणा दुकानांतून मीठ स्वस्त दरात विकण्यासाठी आदेश द्यावेत. वरिष्ठांनी या बाबीकडे विशेष लक्ष देऊन मिठाची साठवणूक व काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. छत्तीसगड राज्यामध्ये गुजरात व मुंबई येथून होणारा मिठाचा पुरवठा कमी झाल्यामुळे तेथे मिठाची चणचण जाणवत असल्याने तेथील ग्राहक गडचिरोली जिल्ह्यातील आपल्या नातेवाईकांमार्फत मिठाची खरेदी करीत आहेत. कोरची येथील किराणा दुकानदारांनी वडसा व गोंदिया येथील मोठ्या व्यापाऱ्यांकडे मिठाची मागणी केली असता तिथेही मिठाचा तुटवडा असल्याचे सांगितले जात आहे. महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह करून सर्वसामान्य माणसाला मीठ स्वस्त दरात मिळावे म्हणून प्रयत्न केले होते. मात्र, यंदा कोरोनाच्या समस्येमुळे मिठाचा तुटवडा जाणवत असल्याचे चित्र छत्तीसगड राज्याच्या सीमेलगतच्या गावांसह जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे.

जीवनावश्‍यक वस्तूंचे दर वाढले

लॉकडाउनच्या नावावर जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा होत नसल्याचे कारण पुढे करून किराणा व्यावसायिकांनी सर्व वस्तूंच्या दरात वाढ केल्याचे दिसून येत आहे. यात साखर, शेंगदाणे, खाण्याचे तेल, तूरडाळ, मूगडाळ, साबण तसेच अन्नधान्याचा समावेश आहे. वस्तूंचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांकडून जीवनावश्‍यक वस्तूंची साठवणूक केली जात आहे. सद्यःस्थितीत सर्व प्रकारची दुकाने सुरू झाल्याने बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी दिसत असून व्यापाऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना देऊनही सुरक्षित अंतर ठेवले जात नसल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com