सारेच पाणी झाले कसे काळे?; पारशिवनीत नळातून होणाऱ्या काळ्या पाण्याची माजीप्रने केली पाहणी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

मुख्य विहिरीत गाळ असल्याचे अंदाज व्यक्त केला. तर पाण्याच्या टाकीत काळे पावडर मोठया प्रमाणात दिसून आले. हे पाणी अशुद्ध असून ते पाणी वापरण्यायोग्य नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पारशिवनी, (जि. नागपूर) : शहरात काळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांत संताप व्याप्त आहे. तर काळे पाणी येते कसे? याची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आज पारशिवनीत पोहचले. पाण्याच्या टाकीचे निरक्षण केल्यावर त्यांना तेथेही काळेच पाणी आढळून आल्याने अधिकारीही बुचकळ्यात पडले. 

पारशिवनी शहरात दुर्गंधीयुक्त पाणी नळाद्वारे घरोघरी पोहचत आहे. हे काळे पाणी पिण्यास नागरिक बाध्य असल्याने नगरपंचायत प्रशासनाविरुद्ध नागरिकांत रोष केला. मंगळवारी नागरिकांनी स्वयंस्फूर्त बंद पुकारून नगर पंचायतीवर धडक दिली. यापूर्वी देखील नागरिकांनी पाण्यासाठी नगर पंचायतीवर महिलांनी धडक दिली होती. मात्र, त्यानंतरही कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नव्हता असा आरोप करण्यात येत होता. याची दखल घेत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी काळ्या पाण्याची चौकशी करण्याचे आदेश दिले. 

नमूने घेतले ते देखील काळेच
सकाळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी पारशिवनीत पोहचले. त्यांनी शहरातील पोलोरा येथील टाकीची पाहणी केली. यावेळी त्यांना टाकीत काळ्या रंगाचे पावडर आढळून आल्याचे सांगण्यात आले आहे. तर पाणीपुरवठा विहिरीतूनही काळे पाणी टाकीत येत आहे. याचमुळे जलवाहिनीतून येणारे पाणीच काळे असल्याचे अंदाज लावला. दुसरीकडे नागरिकांच्या घरून नळातून आलेल्या पाण्याचे नमूने घेतले ते देखील काळेच आढळून आले. 

पाणी नाही वापरा योग्य 
माजीप्रच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत मुख्य विहिरीत गाळ असल्याचे अंदाज व्यक्त केला. तर पाण्याच्या टाकीत काळे पावडर मोठया प्रमाणात दिसून आले. हे पाणी अशुद्ध असून ते पाणी वापरण्यायोग्य नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. काळे पाणी कसे व कुठून येते या सर्व बाबींचा अहवाल व काळ्या पाण्याचे कारण शोधून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

नगरपंचायतची तातडीची बैठक 
शहरातील जलवाहिनी बदलविण्याचा निधी नसल्याचे कारण नगर पंचायत प्रशासनाने पुढे केले होते. यावर तोडगा काढण्यासाठी तातडीची बैठक नगर पंचायतीमध्ये घेण्यात आली. शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला असताना त्यावर तोडगा काण्यासाठी चर्चा करण्यात आल्याची माहिती गटनेता सागर सायरे यांनी दिली. 

नगरपंचायतने परवाणगी द्यावी
महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाची पाणीपुरवठा योजना तयार आहे. त्यातून पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. पण त्यासाठी नगरपंचायतने परवाणगी द्यावी. नगर पंचायत कारणे समोर करून योजना हस्तांतरण करण्यास टाळाटाळ करीत आहे. 
- सतीश गव्हाणकर, कार्यकारी अंभियता, माजीप्र 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Black water in the tank in parshioni