दोन्ही मुलींना घेऊन महिला जंगलात गेली अन्‌ परतलीच नाही...वाचा सविस्तर

 मोझरी (शेकापूर) : बावापूर शिवारातील घटनास्थळी जमलेली गर्दी.
मोझरी (शेकापूर) : बावापूर शिवारातील घटनास्थळी जमलेली गर्दी.
Updated on

मोझरी (शेकापूर), अल्लीपूर (जि. वर्धा) : रानात भरकटलेल्या बैलांचा शोध घेण्याकरिता गेलेल्या महिलेचा आणि तिच्या दोन मुलींचा मृतदेह बावापूर शिवारातील विहिरीत आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी (ता. 26) दुपारी 12 वाजताच्या सुमारास गावाजवळील बावापूर शिवारातील शेतात उघडकीस आली. निर्मला सुमित कुरवटकर (वय 24), राधिका (वय चार), काजल (वय तीन), अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी प्रारंभी या प्रकरणी आत्महत्येची नोंद केली आहे. मृतदेह शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले आहे. या घटनेमागील कारण अद्याप गुलदस्त्यात असून, त्या दिशेने पोलिस तपास करीत आहेत. निर्मला सुमित कुरवटकर हिचे कुटुंब आणि इतर नातलग असे जवळपास 10 कुटुंबे मागील दोन महिन्यांपासून खानगाव (गोटाडे) या भागात मेंढ्या, शेळ्या पालनाचे काम करीत होते. ही सर्व कुटुंबे खानगाव येथील महेश ठाकरे यांच्या गावाजवळील शेतात बेडे ठोकून वास्तव्यात होती.

दोन्ही मुलींना घेऊन निर्मला रानातच थांबली

बेड्यावरील काही पुरषांनी शनिवारी (ता. 25) शिवारात मेंढ्या चारण्यासाठी नेल्या असता निर्मलाच्या कुटुंबाची बैलजोडी रानात भटकली होती. रविवारी सकाळी पुरुष मंडळी शेळ्या, मेंढ्या चारण्यासाठी रानात गेली आणि महिला मंडळी बैल शोधण्यासाठी फिरत होती. मात्र, काही केल्या बैलांचा शोध न लागल्याने निर्मलासोबतच्या महिला बेड्यावर परत आल्या. निर्मला मात्र दोन्ही मुलींना घेऊन रानातच थांबली. उशिरापर्यंत निर्मला बेड्यावर परत न आल्याने बेड्यावरील सर्वच जण तिच्या शोधाकरिता परत रानात गेले आणि त्यांना धक्काच बसला.


विहिरीत आढळले तिघांचे मृतदेह

यावेळी बावापूर शिवारातील ज्ञानेश्‍वर थूल यांच्या शेतातील विहिरीजवळ तिची चप्पल आढळून आली. त्यानंतर सगळ्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता तिघींचे मृतदेह आढळून आले. घटनेची माहिती खानगावचे पोलिस पाटील संजय पाटील यांनी अल्लीपूर पोलिस ठाण्याला दिली.
अल्लीपूर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करून जमादार त्र्यंबक मडावी, शिपाई सतीश नैताम यांनी घटनास्थळ गाठले आणि मृत महिलेसह चिमुकलींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून प्रकरण तपासात घेतले आहे. आत्महत्येमागील नेमके कारण कळू शकलेले नाही.

मेंढ्या पाळण्यासाठी आले होते कुटुंब

निर्मला कुरवटकर ही महिला धनगर समाजातील आहे. ती मूळची गवंडी (खरडा) ता. बाभूळगाव, जि. यवतमाळ येथील रहिवासी आहे. गत दोन महिन्यांपासून ती आपल्या कुटुंबासोबत या भागात मेंढ्या, शेळ्या पाळण्याचा व्यवसाय करीत होती. या व्यवसायात तिच्यासोबत इतर कुटुंबेही होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com