"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर

File photo
File photo

"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर
नागपूर : शरीरसौष्ठव क्षेत्रात मानाची समजली जाणाऱ्या "मॉडर्न फिजिक' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उपराजधानीतील दोन बॉडीबिल्डर्सनी चोरीचा मार्ग निवडला. पण, दुसरी चोरी करताच त्यांना गजाआड जावे लागले. त्यांनी अजनी हद्दीतील ज्ञानेश्‍वरनगरात घरफोडी केली होती. अजनी पोलिसांनी 48 तासांच्या आत घटनेचा पर्दाफाश करीत चोरट्यांना अटक केली.
अफसर खान मोहम्मद खान (31, रा. टिमकी तीनखंबा) आणि इरफान खान (28, रा. खदान, गांधीबाग) अशी आरोपींची नावे आहेत. अफसरच्या भावाची महालातील रामकूलर चौकात "क्राऊन' नावाने जिम आहे. तोही तिथे ट्रेनर म्हणून कामाला आहे. इरफानही बॉडीबिल्डर असून, जिममध्ये येणाऱ्यांना न्यूट्रिशन उपलब्ध करून देतो. जानेवारीत मुंबई येथे होणाऱ्या "मॉडर्न फिजिक' स्पर्धेतही त्यांना भाग घ्यायचा होता. यासाठी आवश्‍यक पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी त्यांनी चोरीचा मार्ग निवडला. 12 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अफसर बंद असलेल्या घरांचा शोध घेण्यासाठी बुलेटवरून फिरत होता.
ज्ञानेश्‍वरनगरात टाकभवरे बंधू एकाच घरात राहतात. दिवाळीच्या सुट्यांमध्ये कुलू मनाली येथे गेले होते. अफसरला टाकभवरे यांचे घर कुलूपबंद दिसले. त्याने लागलीच इरफानला बोलावून घेत रात्री दोनच्या सुमारास घरात शिरले. घरातील तिन्ही कुलूप तोडून चोरटे 60 हजार रुपये रोख, 15 तोळे सोने आणि एसीडी टीव्ही घेऊन गेले. सकाळी चोरी उघडकीस येताच टाकभवरे यांचे जावई सतीश चव्हाण यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्याआधारे पोलिसांनी हायटेक पद्धतीने तपास सुरू केला. पोलिस उपायुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शैलेश संखे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 48 तासांच्या आत दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यांनी हुडकेश्‍वर हद्दीतही चोरी केल्याची कबुली दिली.
बाहेरची भानगडही खर्चिक
अफसर विवाहित असून त्याचे एका अन्य मुलीसोबतही संबंध आहे. ही खर्चिक भानगड आवरणेही त्याला कठीण झाल्याने त्याने चोरीचा मार्ग धरला. मुलगा चोरी करू शकतो, यावर दोन्ही आरोपींच्या कुटुंबीयांना प्रारंभी विश्‍वास नव्हता. यामुळे प्रारंभी पोलिसांना तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. पोलिसांनी ठोस पुरावे दर्शविताच त्यांचा नाइलाज झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com