मजुरांच्या वाहनाला धडक, एकाचा जागीच मृत्यू; सहा जखमी

दीपक फुलबांधे
Thursday, 29 October 2020

या अपघातात गंभीर जखमी झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य सहा जण किरकोळ जखमी झाले.

लाखांदूर (जि. भंडारा) ः  पालांदूर येथून बोलेरो पिकअप वाहनाने मजुरांसह कॅटरिंगच्या कामासाठी जात असताना अचानक वाहन पलटून झालेल्या अपघातात एक जण ठार तर सहा जण जखमी झाल्याची घटना घडली. सदर घटना लाखांदूर तालुक्यातील मासळ -धोलसर रस्त्यावर गुरुवारी सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास घडली. सखाराम रतिराम जांभळकर(60) रा.  पालांदूर असे मृताचे नाव आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी घटनेतील मृतक व अन्य सहा जण बोलेरो पिकअप वाहन क्र. एम एच 36ए.ए.0607ने पालांदूर येथून पवनी तालुक्यातील मोहरी येथे कॅटरिंगच्या कामासाठी जात होते. यावेळी मासळ गाव ओलांडताच वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याखाली उतरले. 

सविस्तर वाचा - आई महिनाभरापासून बेपत्ता असताना बहिणींचे झाले अपहरण; आरोपीचे नाव समोर येताच सर्वांना बसला धक्का
 

सदर वाहन रस्त्याखाली उतरल्याचे पाहून चालक  रस्त्यावर वाहन घेत असताना अचानक वाहन पलटले. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य सहा जण किरकोळ जखमी झाले. या जखमींमध्ये ममता मनोहर लांजेवार(20), धृपदा भालचंद्र लांजेवार (60), बेबी रतिराम नंदनवार (50), रेखा तानबा धकाते (48), छाया तुकाराम कुंभारे (46) व प्रतीक्षा तुकाराम कुंभारे(19)रा. पालांदूर यांचा समावेश आहे. 

घटनेची माहिती लाखांदूर  पोलिसांना मिळताच संबंधितांनी तत्काळ घटनास्थाळी जाऊन जखमींना उपचारार्थ भंडारा येथील सामान्य रुग्णालयात हलविले. या घटनेची नोंद लाखांदूर पोलिसांनी केली असून पुढील तपास येथील ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक संदीप ताराम व पोलिस अंमलदार मनीष चव्हाण करीत आहेत.

संपादन  : अतुल मांगे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bolero pickup vehicle crashes one killed 6 injured