esakal | आई महिनाभरापासून बेपत्ता असताना बहिणींचे झाले अपहरण; आरोपीचे नाव समोर येताच सर्वांना बसला धक्का
sakal

बोलून बातमी शोधा

girls discovered within forty eight hours in Chandrapur

एक तीस-बत्तीस वर्षांची महिला दोन्ही मुलींना घेऊन जाताना दिसली. पोलिसांनी बेपत्ता मुलीचे वडील आणि नातेवाईकांना हे फुटेज दाखविले आणि साऱ्यांनाच धक्का बसला. या मुलींना घेऊन जाणारी त्यांची आई योगिताच होती. अपहरण कर्त्यांचा शोध लागला. मात्र, पोलिस दप्तरी मागील एका महिन्यापासून योगिता बेपत्ता असल्याची नोंद होती.

आई महिनाभरापासून बेपत्ता असताना बहिणींचे झाले अपहरण; आरोपीचे नाव समोर येताच सर्वांना बसला धक्का

sakal_logo
By
साईनाथ सोनटक्के

चंद्रपूर : शहरातील भिवापूर परिसरातून दोन दिवसांपूर्वी पाच आणि सहा वर्षांच्या सख्या बहिणीचे अपहरण झाले. सकाळी नऊ वाजताच्या सुमाराला घडलेल्या या घटनेने अख्खी पोलिस यंत्रणा हादरली. स्वतः जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सूत्र हाती घेतली आणि ४८ तासांच्या आता अपहरण प्रकरणाचा छडा लावला. मात्र, अपहरणाची घटना जेवढी धक्कादायक तेवढीच या मुलींच्या अपहरणकर्त्यांचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांना धक्का बसला. अपहरणकर्त्याची सुद्धा एका महिन्यापासून पोलिस दस्ताऐवजाता बेपत्ता अशी नोंद होती.

शहर पोलिसांनी या दोन्ही चिमुकल्या बहिणींना वर्धा येथून ताब्यात घेतले. सध्या त्या बाल कल्याण समितीच्या ताब्यात आहे. मात्र, तब्बल दोन दिवस या अपहरणाने पोलिसांची झोप उडविली. या अपहरण नाट्याची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील कौटुंबिक वादातून झाली. वरोरा येथील योगिताचा (नाव बदलले आहे) विवाह वणी येथे झाला. संसाराचा सुरुवातीचा काळ आनंदात गेला. दरम्यान, दाम्पत्याला दोन मुलीही झाल्या. त्यानंतर मात्र त्यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली.

जाणून घ्या - अबब! नागपुरात जन्माला आले चक्क पाच किलो वजनाचे बाळ

दोन्ही मुलींना वडिलांकडे सोडून योगिता मोहरी परतली. एका महिन्यापूर्वी अचानक योगिता बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार वरोरा पोलिसात केली आहे. दुसरीकडे दोन्ही मुली वडिलांसह वणी येथून चंद्रपुरातील भिवापूर वॉर्डात राहणाऱ्या नातेवाईकाकडे तीन दिवसांपूर्वी आल्या. अंगणात खेळत असताना सकाळी नऊ वाजताच्या सुमाराला दोन्ही मुली दिसेनासे झाल्या. बराच वेळ शोध घेतल्यानंतर दुपारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पाच आणि सहा वर्षांच्या मुलींच्या अपहरणाचे प्रकरण असल्याने पोलिस यंत्रणाही सतर्क झाली. स्वत: जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी सूत्र हातात घेतली आणि शहर पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसले. जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली. पोलिस ठाण्यांना अपहरणाची सूचना देण्यात आली. मात्र, पहिल्या दिवशी पोलिसांच्या हाती काहीच धोगेदोर लागले नाही. शेवटी मुली बेपत्ता झाल्या त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले.

हेही वाचा - ‘गेम’ करण्याची धमकी दिल्यामुळे दगडाने ठेचून कुख्यात गुंडाचा खून

एक तीस-बत्तीस वर्षांची महिला दोन्ही मुलींना घेऊन जाताना दिसली. पोलिसांनी बेपत्ता मुलीचे वडील आणि नातेवाईकांना हे फुटेज दाखविले आणि साऱ्यांनाच धक्का बसला. या मुलींना घेऊन जाणारी त्यांची आई योगिताच होती. अपहरण कर्त्यांचा शोध लागला. मात्र, पोलिस दप्तरी मागील एका महिन्यापासून योगिता बेपत्ता असल्याची नोंद होती. त्यामुळे तिचा ठावठिकाणा शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले. शेवटी पोलिसांनी नातेवाईकांची झाडाझडती घेतली. तेव्हा एका नातेवाईकाच्या संपर्कात योगिता असल्याचे समोर आले.

खोली भाड्याने घेऊन ती राहायची

पोलिसांना तिचा भ्रमणध्वनी क्रमांक नातेवाईकांकडून भेटला. पोलिसांनी सीडीआर तपासला आणि योगिताचे ‘लोकशेन’ मिळाले. ती एका महिन्यापासून वर्धा येथे खोली भाड्याने घेऊन ती राहत होती. पोलिस उपनीरीक्षक शैलेश जगताप यांच्या नेतृत्वातील पथकाने योगिता आणि दोन्ही मुलींना ताब्यात घेतले. मुलींना बाल कल्याण समितीकडे सोपविण्यात आले. याप्रकरणात पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा -  Video गावाचा सुपुत्र निघाला आर्मीत; गावकऱ्यांनी दिला आगळावेगळा निरोप

आई-वडिलांचा जीव भांड्यात

दोन्ही मुली वडिलांसह चंद्रपुरात येत असल्याची माहिती योगिताला नातेवाईकाने दिली होती. दोन्ही मुली मिळाल्याने वडिलांचा आणि योगिता सापडल्याने तिच्या आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला. अठ्ठेचाळीस तासापासून राबविलेल्या शोध मोहीमेला यश आल्याने पोलिसांनीही सुटकेचा नि:श्‍वास सोडला आणि अपहरणनाट्याचा शेवट झाला.

संपादन - नीलेश डाखोरे