दोघेही कारने जेवायला चालले होते! आणि त्यांच्या नशिबात असे ताट वाढून ठेवले...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 मार्च 2020

तळोधी येथील महात्मा फुले विद्यालयात गुलाब कामडी मुख्याध्यापक आणि दादाजी फटाले शिक्षक म्हणून कार्यरत होते. दोघेही शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास नागभीड येथे जेवण करायला कारने (एमएच- 49, ए- 8341) जात होते.

तळोधी (बा) (जि. चंद्रपूर) : तळोधीपासून सात किलोमीटर अंतरावरील जनकापूर फाट्याजवळ धानाचे पोते घेऊन जाणारा ट्रक त्याच मार्गाने जाणाऱ्या कारवर उलटला. या अपघातात तळोधी येथील दोन शिक्षकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गुलाब कामडी (वय 54) आणि दादाजी फटाले (वय 54) असे अपघातात मृत पावलेल्या शिक्षकांची नावे आहे. हा अपघात शुक्रवारी (ता.13) रात्री आठ वाजताच्या सुमारास घडला. 

अवश्य वाचा- चालकाला पायदळी तुडवून ती तशीच धावत राहिली... ​

तळोधी येथील महात्मा फुले विद्यालयात गुलाब कामडी मुख्याध्यापक आणि दादाजी फटाले शिक्षक म्हणून कार्यरत होते. दोघेही शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास नागभीड येथे जेवण करायला कारने (एमएच- 49, ए- 8341) जात होते. मार्गावरून त्यांची कार धावत असताना कारच्या मागे धानाचे पोते भरलेला ट्रक (एमएच-35 के-3825 ) होता. हा ट्रक ओव्हरलोड होता. ट्रकने कारला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रकमध्ये वजन जास्त असल्याने त्याचे संतुलन बिघडून ट्रक धानाच्या पोत्यांसकट धावत असलेल्या शिक्षकांच्या कारवर उलटला. ट्रक आणि धानाच्या पोत्यांच्या वजनाने कारमधील दोन्ही शिक्षकांच्या डोक्‍याला जबर मार लागला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

शिक्षकांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ

नागभीड-तळोधी राज्य महामार्गाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. जनकापूर फाट्याजवळील नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी वळण मार्ग योग्य पद्धतीने तयार केला नाही. त्यामुळे अपघात झाल्याचे मृतांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. ट्रकचालक संतोष बाभले (वय 40) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर भादंवी 279, 304, 427 अन्वये गुन्हा नोंद केला आहे. दोन शिक्षकांच्या अपघाती मृत्यू तळोधी गाव आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Both were going outside to take dinner! They do not no it will happen...