काय सांगता? खुद्द कुलगुरुंच्या निरोप समारंभावरच बहिष्कार!

मिलिंद उमरे
Monday, 7 September 2020

गोंडवाना विद्यापीठाचे मावळते कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांचा पाच वर्षांचा सेवा कालावधी रविवारी (ता. ६) संपुष्टात आला असल्याने त्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमास विद्यापीठातील शिक्षकेतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी दुपारी दोन वाजता उपस्थित राहावे, अशी विनंती कुलसचिवांनी दोन्ही संघटनांच्या अध्यक्षांना केली आहे.

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचे मावळते कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांच्या सोमवारी (ता. ७) आयोजित निरोप समारंभावर गोंडवाना विद्यापीठातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दोन संघटनांनी बहिष्कार घातला त्यामुळे नियुक्तीपासूनच वादग्रस्त राहिलेले कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांचा निरोप समारंभही अशा वाद व असंतोषाच्या वातावरणातच पार पडला.

यासंदर्भात गोंडवाना विद्यापीठ अधिकारी व कर्मचारी संघटना,गडचिरोलीच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गोंडवाना विद्यापीठाचे मावळते कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांचा पाच वर्षांचा सेवा कालावधी रविवारी (ता. ६) संपुष्टात आला असल्याने त्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमास विद्यापीठातील शिक्षकेतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी दुपारी दोन वाजता उपस्थित राहावे, अशी विनंती कुलसचिवांनी दोन्ही संघटनांच्या अध्यक्षांना केली आहे.

याबद्दल दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी सकाळी ११ वाजता संयुक्त सभा पार पडली. गेल्या पाच वर्षांतील अधिकारी व कर्मचारी यांना आलेले अनुभव अतिशय वाईट असल्यामुळे तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दलची विचारधारा अत्यंत निकृष्ट व हीन दर्जाची असल्यामुळे दोन्ही संघटनांनी सर्वानुमते समारंभ कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा अर्थात बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही संघटनांनी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, असे निर्देश दिल्याचे गोंडवाना विद्यापीठ अधिकारी व कर्मचारी संघटना, गडचिरोलीचे अध्यक्ष दीपक जुनघरे व सहसचिवनी या पत्रकात म्हटले आहे.

सविस्तर वाचा - कोरोनाबाधित पोलिसांच्या पाठीशी आता खुद्द नागपूरचे नवनियुक्त सीपी! वाचा काय केले वक्तव्य

स्वतंत्रपणे स्वागत, सत्कार
मावळत्या कुलगुरूंवर रोष असला, तरी नव्याने रुजू होत असलेले कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांच्याबद्दल कोणताही पूर्वग्रह किंवा रोष नाही. त्यामुळे नवे कुलगुरू डॉ. वरखेडी यांचे स्वागत व सत्कार दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांच्या कक्षात करण्यात येईल, अशीही माहिती देण्यात आली आहे.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boycott at the Vice-Chancellor's farewell ceremony