प्रेमिकेला भेटण्यासाठी मुले घेतात मुलींचा वेश, या जिल्ह्यात आहे हा खास रस्ता

Boy dress up as girl
Boy dress up as girl

पथ्रोट (अमरावती) : येथील राणी रस्त्याला प्रेमीयुगुलांची प्रथम पसंती आहे. याठिकाणी युवक युवतींच्या वेशात येऊन प्रेमिकेला भेटतात. प्रेमीयुगुलांच्या दररोज होणाऱ्या गर्दीमुळे प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या बाजूला असलेल्या रस्त्याला राणी रस्ता, असे नाव पडले आहे. बसस्टॅण्डवरून गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याला संलग्न असणारा हा रस्ता आहे.

या रस्त्यावर महिलांचे जुने सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. गावाच्या मध्यभागी जाण्या-येण्याकरिता काही नागरिक या रस्त्याचा वापर करतात. तर याच रस्त्यावर देशी दारूच्या दुकानात जाण्याचा शॉर्टकट असल्याने अनेक तळीराम येथूनच ये-जा करतात. असा दिवस-रात्र वाहतूक सुरू असलेला हा रस्ता आहे. तरीही गावातील प्रेमीयुगुल याठिकाणी भेटतात. त्यामुळे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत येथे प्रेमीयुगुलांची गर्दी असते.

रस्त्यावर गाड्या लावून प्रेमाच्या आणाभाका घेऊन तासन्‌तास गप्पांचे फड रंगतात. अनेक प्रेमवीर येथे दुचाकीवर स्टंटबाजीही करतात. पावसाळ्याच्या दिवसांत येथे जत्राच भरते. येथूनच प्रेयसीला सोबत न्यायचे आणि सायंकाळी येथेच आणून सोडायचे, असा प्रेमिकांचा नित्यक्रम असतो. हे सर्व दृश्‍य रस्त्यावरून पायदळ जाणारे व दुचाकी चालक मुकाट्याने पाहत निघून जातात. त्यांच्या विरुद्ध जाण्याची कोणी हिंमत दाखवीत नाही.

काही दिवसांपूर्वी तर एका तरुण मुलाने मुलीचे कपडे घालून याठिकाणी आपल्या प्रेमिकेची भेट घेतली. त्यावेळी कपडे बदलताना तो काहींना दिसून आला. तेव्हा कुठे या प्रकरणाची पोलखोल झाली. मागच्या काही दिवसांपर्यंत या रस्त्याला लागूनच असलेल्या एका इमारतीत पोलिस ठाणे कार्यरत होते. परंतु तेसुद्धा आता नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित झाल्याने प्रेमवीरांना पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाला झळाळी देण्यासाठी रान मोकळे आहे.

सध्या कोरोनामुळे वावरण्यावर मर्यादा आल्या आहेत. तरीही पथ्रोट येथील राणी रस्त्यावरील गजबज दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाळी वातावरणामुळे प्रेमीयुगुलांची पावले या रस्त्याकडे वळत आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ही गर्दी धोक्‍याची ठरू शकते. त्यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com