ब्राव्हो अवंतिका! यवतमाळच्या कन्येची "मिस इंडिया'साठी निवड 

मनीष जामदळ 
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

गतवर्षी मलेशिया येथे झालेल्या "मिस इंडिया इंटरनॅशनल' स्पर्धेत दिल्लीच्या एका युवतीने बाजी मारली होती. दोन वर्षांपूर्वी नाशिक येथे पार पडलेल्या सौंदर्यवती स्पर्धेत अवंतिकाने पुणे, मुंबईसारख्या महानगरातील स्पर्धकांना मागे टाकत "मिस महाराष्ट्र' हा किताब पटकाविला होता.

यवतमाळ : इंडोनेशिया येथे होणाऱ्या "मिस इंडिया इंटरनॅशनल' स्पर्धेसाठी देशभरातील 30 युवतींची निवड झाली आहे. त्यामध्ये यवतमाळची रहिवासी तथा "मिस महाराष्ट्र'चा किताब पटकाविलेल्या अवंतिका बरडे हिचा समावेश आहे. 

इंडोनेशिया येथे 18 नोव्हेंबरला "मिस इंडिया इंटरनॅशनल' ही स्पर्धा होत आहे. झारखंड, उत्तराखंड, गोवा, बिहार, उत्तरप्रदेश, पंजाब, राजस्थान, गुजरात आदींसह देशभरातून तब्बल 9 हजार सौंदर्यवतींनी या स्पर्धेसाठी अर्ज केले होते. पैकी केवळ 30 सौंदर्यवतींची स्पर्धेसाठी निवड झाली. यात महाराष्ट्रातील दोघींचा समावेश आहे.

गतवर्षी मलेशिया येथे झालेल्या "मिस इंडिया इंटरनॅशनल' स्पर्धेत दिल्लीच्या एका युवतीने बाजी मारली होती. दोन वर्षांपूर्वी नाशिक येथे पार पडलेल्या सौंदर्यवती स्पर्धेत अवंतिकाने पुणे, मुंबईसारख्या महानगरातील स्पर्धकांना मागे टाकत "मिस महाराष्ट्र' हा किताब पटकाविला होता.

बाह्य सौंदर्यासोबतच मनाचा खंबीरपणा, आत्मिक सौंदर्य, बौद्घिक क्षमता आदी परीक्षणात तिने आपले कसब दाखविले होते. शिवाय 2015 मधील "मिस विदर्भ' स्पर्धेत अवंतिकाला "बेस्ट वॉक' व 2017 मध्ये "मिस दिव्या' हा पुरस्कार मिळाला आहे. अवंतिका बी.एस्सी.चे शिक्षण घेत आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरविलेल्या अवंतिकाने जिद्दीच्या जोरावर हे यश मिळविले आहे. 

या स्पर्धेसाठी प्रथम ऑनलाइन ऑडिशन घेण्यात आले. त्यामध्ये स्वत:चे प्रोफाइल अपलोड केल्यानंतर त्याला 200 पेक्षा जास्त मत मिळणे अनिवार्य होते. सोबतच यू ट्यूबवरील "इन्ट्रोडक्‍शन व्हिडिओला' 100 पेक्षा जास्त लाइक्‍स गरजेचे होते. या दोन्हीमध्ये पात्र ठरल्यानंतर मुलाखतीद्वारे फायनल स्पर्धेसाठी माझी निवड झाली. 
-अवंतिका बरडे 
मिस महाराष्ट्र तथा स्पर्धक, यवतमाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bravo Avantika! Yavatmal's daughter selected for "Miss India"