esakal | लग्नसोहळ्यात वधू-वरांचे अनोखे कार्य; स्टडी सर्कलच्या अभ्यासिकेला दिली पाच हजारांची पुस्तके भेट!
sakal

बोलून बातमी शोधा

पुसद (जि. यवतमाळ) : वसंत-सुधा स्टडी सर्कलचे प्रा. विजय राठोड यांना पुस्तके भेट देताना नवदाम्पत्य.

पुसद येथील शेखर वानखेडे व रोशनी टाले यांचा लग्नसोहळा येथील मंगल कार्यालयात गुरुवारी (ता.12) पार पडला. मंगलाअक्षता उधळल्यानंतर वर शेखर व वधू रोशनी यांनी पाच हजार 200 रुपये किमतीची स्पर्धा परीक्षा पुस्तके वसंत-सुधा स्टडी सर्कलचे संयोजक प्रा. विजय राठोड यांच्याकडे सुपूर्द केली.

लग्नसोहळ्यात वधू-वरांचे अनोखे कार्य; स्टडी सर्कलच्या अभ्यासिकेला दिली पाच हजारांची पुस्तके भेट!

sakal_logo
By
दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ)  :  लग्नसोहळ्यात वधू-वरांना शुभेच्छांसह भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. मात्र, पुसद येथील शेखर वानखेडे व रोशनी टाले या नवदांपत्याने आपल्या लग्नसोहळ्यात स्पर्धा परीक्षेची पुस्तके वसंत-सुधा स्टडी सर्कलच्या संचालकांना भेट दिली. या अनोख्या भेटीने वऱ्हाडी मंडळींना सुखद धक्का दिला.

पुसद येथील गोविंदनगरातील शेखर मारुती वानखेडे हे यवतमाळ येथील जिल्हा न्यायालयातील लिपिक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी पुसद येथील फुलसिंग नाईक महाविद्यालयातील वसंत-सुधा स्टडी सर्कलच्या अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला व त्यांची निवड झाली. अभ्यासिकेचे महत्त्व लक्षात आल्याने शेखर यांनी अभ्यासिकेला स्पर्धा परीक्षांची पुस्तके भेट द्यावी, असे मनोमन ठरविले व त्यांनी भेटीचा मुहूर्त विवाह सोहळ्यात निश्‍चित केला.

अवश्य वाचा  :  विदर्भातील शेतकऱ्यांना मिळणार अत्यल्प नुकसान भरपाई; बळीराजांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

योगायोगाने शेखर यांचा विवाह पुसद येथील ऍक्‍सिस बॅंकेच्या सहायक मॅनेजर रोशनी अनंत टाले यांच्याशी जुळला. हा लग्न सोहळा येथील मंगल कार्यालयात गुरुवारी (ता.12) पार पडला. मंगलाअक्षता उधळल्यानंतर वर शेखर व वधू रोशनी यांनी पाच हजार 200 रुपये किमतीची स्पर्धा परीक्षा पुस्तके वसंत-सुधा स्टडी सर्कलचे संयोजक प्रा. विजय राठोड यांच्याकडे सुपूर्द केली. या भेटीबद्दल अभ्यासिकेचे विद्यार्थी प्रतिनिधींनी नवदाम्पत्याचे आभार मानले.

शहरात एकमेव अभ्यासिका

सुरुवातीच्या काळात वसंत-सुधा स्टडी सर्कल शहरात एकमेव अभ्यासिका होती. येथे विशेषत: पोलिस भरती, सैन्यभरतीचा अभ्यास करणारे पुसद शहरासह तालुक्‍यातील विद्यार्थी येत असतात. येथील अनेक विद्यार्थी राज्यातील अनेक जिल्ह्यांत पोलिस भरती व सैन्य भरतीत निवड झालेले आहेत. विद्यार्थ्यांना या पुस्तकांचा निश्‍चितपणे लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

जाणून घ्या  :  ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग; दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

पुष्पगुच्छ ऐवजी पुस्तके भेट द्या!
लग्न अथवा वाढदिवसात पुष्पगुच्छऐवजी स्पर्धा परीक्षेची उपयुक्त पुस्तके भेट द्यावीत. मुख्य तीन गरजांसोबत पुस्तके ही चौथी मूलभूत गरज आहे. पुस्तकांमुळे जीवनात दिशा मिळते. यापुढेही इतर अभ्यासिकांना टप्प्याटप्प्यात पुस्तके भेट देण्याची इच्छा आहे. अभ्यासिकेस पुस्तक भेट देण्याची प्रेरणा माझे काका प्रा. अशोक वानखेडे, प्रा. लक्ष्मण वानखेडे, मामा प्रा. रमेश वाघमारे यांच्याकडून मिळाली.
- शेखर वानखेडे, पुसद.

(संपादन  : दुलिराम रहांगडाले)
 

loading image