नवरदेव आला अन्‌ नवरीला दुचाकीवर घेऊन गेला...वाचा...कसे लागले लग्न?

 नवेगावबांध : आपल्या नववधूला दुचाकीवर घेऊन जाताना वर मिथुन.
नवेगावबांध : आपल्या नववधूला दुचाकीवर घेऊन जाताना वर मिथुन.

नवेगावबांध (जि. गोंदिया) : लॉकडाउन आणि संचारबंदी वाढत असल्याचे पाहून वर मिथुनने वधू रंगीताचे घर गाठले आणि संचारबंदीचे सर्व नियम पळून विवाहबद्ध झाला. त्यानंतर वधू रंगीताला दुचाकीवर बसवून थेट आपले राका हे गाव गाठले. हा अनोखा विवाह परसोडी रयत येथे पार पडला.

अर्जुनी मोरगाव तालुक्‍यातील परसोडी रयत येथील तुलाराम भेंडारकर यांची कन्या रंगीता व सडक अर्जुनी तालुक्‍यातील राका येथील रवींद्र फुंडे यांचे चिरंजीव मिथुन यांचा विवाह पूर्वीच ठरला होता. 5 मे रोजी सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांचा शुभमुहूर्त निघाला होता. परंतु, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात व राज्यात तीनदा लॉकडाउन करण्यात आल्यामुळे आता विवाह करायचा कसा? असा प्रश्न वर-वधू पित्यांना पडला होता.

मोजक्‍या पाहुण्यांच्या उपस्थितीत लागले लग्न

रवींद्र फुंडे यांच्या मिथुन मुलाचा विवाह परसोडी रयत येथील मुलीसी ठरला होता. तर त्यांची मुलगी करिष्मा हिचा विवाह भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्‍यातील सोनपुरी येथील जगन कठाणे यांचा मुलगा धनपाल याच्याशी निश्‍चित झाला होता. मुलगा व मुलीचे लग्न 5 मे रोजी सायंकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राका येथे लागणार होते. मुलाचा व मुलीचा लग्न सामाजिक रीतीरिवाजाप्रमाणे धामधुमीत करण्याचा फुंडे यांचा विचार होता. परंतु, त्यात कोरोना आडवा आला. त्यानंतर 17 मेपर्यंत तिसरा लॉकडाउन सुरू झाला. याबाबत त्यांनी प्रशासनाला विचारले असता वराकडचे पाच व वधूकडील 20 वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत विवाह करण्याची परवानगी देण्यात आली.

मास्क लावून पार पडला आदर्श विवाह

5 मे रोजी सकाळी 11 वाजता पाच पाहुणे घेऊन वर मिथुन वडील रवींद्र फुंडेसोबत दुचाकीवर स्वार होऊन वधू मंडपी परसोडी रयत येथे आले. सामाजिक अंतर व मास्क लावून मिथुन आणि रंगीता यांचा आदर्श विवाह मोजक्‍या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर मिथुन दुचाकीवर आपली नववधू रंगीताला राका येथे घेऊन गेला. त्याच दिवशी सायंकाळी 4 वाजता प्रशासनाने मंजुरी दिलेल्या मोजक्‍या पाहुणे मंडळीत करिष्मा व धनपाल यांचा विवाह, संचारबंदीचे नियम पाळून राका येथे पार पडला.

भावाने व्हिडिओ कॉलवरून पाहिला विवाह

लॉकडाउनमुळे रोजगारासाठी गेलेला भाऊ अजय मुंबईलाच अडकला आहे. अजयने मुंबईवरून व्हॉट्‌सअप व्हिडिओ कॉलवरून बहिणीचा लग्न सोहळा याची देही याची डोळा पाहिला. या आदर्श विवाहाचे परिसरात कौतुक केले जात आहे.

साध्या पद्धतीच्या विवाहाचे समाधान
मुलामुलीचे (मिथुन, करिष्माचे) लग्न आधीच ठरले होते. लग्नसमारंभासाठी किराणा, अन्नधान्य सर्व विकत घेतले होते. बॅंड बाजा, डेकोरेशन, आचारी यांना ऍडव्हान्सदेखील देण्यात आले. परंतु, संचारबंदी व लॉकडाउनमुळे थाटामाटात, समारंभात लग्न करता आले नाही. त्यामुळे वेळेचे भान ठेवून साध्या पद्धतीने विवाह संपन्न झाल्याचे समाधान आहे.
- रवींद्र फुंडे, वरपिता राका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com