सख्या भावानेच केला भावाचा खून; कारण, जागा विकण्यावरून सुरू होता वाद

सूरज पाटील
Monday, 19 October 2020

रविवारी सकाळी गजाननचा मृतदेह घराजवळच रस्त्यावर पडून असलेला आढळून आला. शिवाय मृताच्या डोक्‍यावर व गळ्याखाली जखमाही आढळून आल्या. याप्रकरणी पुसद शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, बजरंग काळे यास अटक करण्यात आली आहे.

पुसद (जि. यवतमाळ) : येथील गणेश वॉर्डात राहणाऱ्या दोन सख्या भावांत झालेल्या घरगुती वादात एकाचा खून झाला. ही घटना रविवारी (ता. १८) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पुसद शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन बालाजी काळे (वय ३०, रा. गणेश वॉर्ड, पुसद) असे मृताचे नाव आहे. गजानन व त्याचा सख्या भाऊ मारोती उर्फ बजरंग काळे यांच्यामध्ये जागा विकण्यावरून वाद सुरू होता. याच वादामुळे बजरंगने गजाननचा खून केल्याची तक्रार साविता शेषराव राऊत (रा. इटावा वॉर्ड, पुसद) यांनी पुसद शहर पोलिस ठाण्यात केली.

हेही वाचा - चार एकरात 51 क्विंटल सोयाबीन, विधवा महिला अलिशान बी. ने घेतले विक्रमी उत्पादन

रविवारी सकाळी गजाननचा मृतदेह घराजवळच रस्त्यावर पडून असलेला आढळून आला. शिवाय मृताच्या डोक्‍यावर व गळ्याखाली जखमाही आढळून आल्या. याप्रकरणी पुसद शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, बजरंग काळे यास अटक करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करीत आहेत. दरम्यान, या घटनेने पुसद शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

शाब्दिक वादात महिलेचा खून

पंचफुला (वय ४०, रा. गणोरी) ही महिला किसन कंगाले यांच्यासोबत बकऱ्या चारण्यासाठी गेली होती. त्याचवेळी मागाहून संशयित सचिन हरिदास फाले (वय २५, रा. गणोरी) हा आला. ‘तू आमच्या मागे का येत आहे’, अशी विचारणा महिलेने केले. यावर पाला आणण्यासाठी जात असल्याचे तरुणाने सांगितले.

सविस्तर वाचा - मुलगा विहिरीत तडफडत होता; त्याला वाचवण्यासाठी आई आकांत करत होती, पण नियतीनं डाव साधला

दरम्यान, बाजूच्या शेतात जावून तरुणाने भीतीदायक आवाज काढला. त्यामुळे महिलेने जाब विचारल्याने शाब्दिक वाद झाला. तरुणाने रागाच्या भरात दगडाने मारहाण करून महिलेला ठार केले. याप्रकरणी पती राजेंद्र रामाजी कांबळे (वय ४५, रा. गणोरी) यांनी बाभूळगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून सचिन फाले याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: brother killed his brother