बुलडाणा : शेतकऱ्याने लावला थेट मुख्यमंत्र्यांना फोन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Buldana farmer call to Chief Minister

बुलडाणा : शेतकऱ्याने लावला थेट मुख्यमंत्र्यांना फोन

देऊळगावराजा : तालुक्यासह चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा तालुक्यात रोही (नीलगाय) यांचा सुळसुळाट झाला असून, रोहींचे कळप शेतीपिकांची अतोनात नासाडी करत आहे. वन विभाग परिसरातील रोहींच्या वाढत्या संख्येने हतबल झालेले दिसत असून रोहीच्या कळपांना शेतकर्‍यांच्या शेती पिकात जाण्यापासून प्रतिबंध लावण्यासाठी कुठलेच उपाय करताना दिसत नाही. रोही या वन्य प्राण्याच्या हैदोसाने त्रस्त वाकी बुद्रूक येथील शेतकरी उद्धव नागरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून शेतकऱ्यांच्या वेदनाशी अवगत केले. मुख्यमंत्री शिंदे व शेतकरी उद्धव नागरे यांच्या संभाषणाचा ऑडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

तालुक्यासह शेजारच्या सिंदखेडराजा व लोणार परिसरात रोही वन्यप्राण्याचा हौदोस सुरु आहे. याबाबत दैनिक सकाळने सविस्तर वृत्त प्रकाशित करून वन विभागाचे लक्ष या विषयाकडे वेधले, शेतकर्‍यांच्या सोयाबीन, उडीद, मूग, कपाशी आदी पिकांची रोही प्राणी नासाडी करत असल्याने शेतकरी त्रस्त झाले असून हातातोंडाशी आलेला घास निघून जात असल्याचे डोळ्याने पाहत हतबल आहेत.वन विभागाने पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. त्यानंतर,आज उद्धव नागरे या वाकी बुद्रूक येथील शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला व आपली कैफियत ऐकवली.

मुख्यमंत्र्यांनीही ती शांततेने ऐकून घेत, आपल्या स्वीय सहाय्यकांना तक्रार नोंदवून घेण्यास सांगितले. त्यानंतर महसूल व वनविभागाच्या सचिवांना फोन लावून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले. मूळ शिवसेनेची संबंध असलेल्या सदर शेतकर्‍याने थेट मुख्यमंत्री शिंदे यांना आपल्या मोबाईलद्वारे फोन केल्याबाबतचा ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला.

नुकसानीबाबत बैठक : डॉ. शिंगणे

रोहिंपासून शेती पिकाची नासाडी होत असल्याबद्दल माझ्या मतदारसंघातून असंख्य शेतकर्‍यांचे फोन आले आहे. याबाबत येत्या १ ऑगस्टला जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हा वनअधिकारी व संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी यांची बैठक लावलेली आहे.सदर बैठकीत वन्य प्राण्यांकडून झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकर्‍यांना मदती सह रोही यांच्या प्रतिबंध संदर्भात तात्काळ उपाय योजना करा असे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना देऊ अशी प्रतिक्रिया आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दैनिक सकाळशी बोलताना दिली.

रोही यांच्यापासून शेत नुकसानी संदर्भात अद्याप जिल्हा वन विभागाकडे तक्रार अथवा माहिती मिळाली नाही तरीही या संदर्भात संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याशी संपर्क करून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याकरिता प्रतिबंधित उपाय योजना करू शेतीचे नुकसान टाळता येण्यासारखे सर्व उपाययोजना राबविण्यासाठी वन अधिकाऱ्यांना आदेश देऊ, नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठवू

- अक्षय गजभिये, उपवनसंरक्षक, बुलडाणा.

Web Title: Buldana Farmer Call To Chief Minister Audio Viral On Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..