
Buldana : पेपर फोडणारे चारही शिक्षक निलंबित
बुलडाणा / साखरखेर्डा : संपूर्ण राज्यात गाजणाऱ्या सिंदखेडराजा तालुक्यातील बारावी बोर्डाच्या पेपरफूट प्रकरणात पोलिस कोठडीत असलेल्या चारही शिक्षकांना शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश मुकुंद यांनी आज (ता. ९) एका आदेशाने निलंबित केले.
दरम्यान विषेष चौकशी पथकाने आज सायंकाळी आणखी एका आरोपीला साखरखेर्डा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेंदूर्जन येथून ताब्यात घेतले. आता याप्रकरणी आरोपीची संख्या आठ झाली आहे.
मागील आठवड्यात घडलेल्या १२ वी बोर्डाचा पेपर फुटल्याप्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी सात आरोपींना अटक केली होती. सर्व आरोपींना देऊळगाव राजा न्यायालयाने १० मार्चपर्यंत पोलिस कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले होते.
पोलिस कोठडीत असलेल्या गजानन आडे, गोपाल शिंगणे, अ. अकील अ. मुनाफ व अंकुश चव्हाण या चार शिक्षकांच्या निलंबनाचे आदेश बुलडाणा शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी (माध्यमिक) प्रकाश मुकुंद यांनी आज जारी केले. निलंबित झालेल्या चार शिक्षकांपैकी गजानन आडे आणि गोपाल शिंगणे हे दोघे स्वतःच्याच शिक्षण संस्थेत कार्यरत होते.
अखिल हा लोणारच्या जाकीर हुसेन उर्दू हायस्कूलचा प्राचार्य होता, तर अंकुश चव्हाण हा सेंट्रल पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक होता. शिक्षण विभाग आणि उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाने या प्रकरणाला गांभीर्याने घेतले आहे. राज्यभर गाजलेल्या सदर प्रकरणात चार शिक्षकांच्या निलंबनाने जिल्ह्यातील शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
आरोपींची संख्या आठ
जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाचा अधिक सखोलतेने तपास करण्यासाठी एक विशेष पथक गठित केले. या पथकाने आज सायंकाळी आणखी एका आरोपी दानिश खा फिरोजखा पठाण (वय २१, रा. शेंदूर्जन) याला साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शेंदूर्जन येथून ताब्यात घेतले. आता याप्रकरणी आरोपीची संख्या आठ झाली आहे.