बुलडाणा जिल्हा परिषदही भाजपच्या हातून गेली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

राज्यातील बदलत्या समीकरणांचा प्रभाव बुलडाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदांच्या निवडणुकांवरही पडला. जिल्हा परिषदेत भाजपच्या हाती असलेल्या सत्ता गेली असून, या ठिकाणी महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे.

बुलडाणा : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज (ता.8) पार पडली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षपदी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या मनिषा नितीन पवार तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या कमलताई जालिंदर बुधवत ह्या विजयी झाल्या.

राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हा महाविकास आघाडीच्या फॉर्मुला यशस्वी ठरल्यानंतर आता हेच समीकरण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही यशस्वी ठरत आहे. त्याच अनुषंगाने आज झालेल्या निवडणुकीत बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसतर्फे जानेफळ जिल्हा परिषद गटातील सौ. मनिषा नितीन पवार तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या सौ. कमलताई जालिंदर बुधवत यांचे अर्ज दाखल झाले होते. तर भाजपतर्फे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी सौ. रुपाली अशोक काळपांडे व सौ. जयश्री विनोद टिकार असे दोन दोन अर्ज दाखल केले होते.

हेही वाचा - चलो दिल्ली

भाजपला सत्तेतून खाली खेचण्यास यशस्वी
भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी त्यांचे अर्ज शेवटच्या क्षणी मागे घेतल्यामुळे बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसच्या सौ. मनीषा नितीन पवार तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या सौ. कमलताई जालिंदर बुधवत यांची निवड अविरोध विजयी म्हणून जाहीर घोषित करण्यात आली आहे. या निवडणुकीत भाजपला सत्तेतूच खाली खेचण्याचा महाविकास आघाडीचा डाव यशस्वी ठरला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: buldana zilla Parishad also passed through the hands of BJP