esakal | चलो दिल्ली!
sakal

बोलून बातमी शोधा

Shetkari jagar manch.jpeg

शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन आणि माजी केंद्रिय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात शेतकरी जागर मंच, 9 जानेवारीपासून ‘मुंबई ते दिल्ली’ ‘गांधी शांती यात्रा’ करीत असल्याचे, शेतकरी जागर मंचचे संयोजक प्रशांत गावंडे यांनी सांगितले

चलो दिल्ली!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : हम कागद नही दिखाएंगे!
तानाशाह आके जाएंगे, हम कागद नही दिखाएंगे!
तूम आसू गॅस उछालोंगे, तूम जहर की चाय उबालोंगे!
हम प्यार की शक्कर घोल के उसको गट गट गट पी जाएंगे,
हम कागज नही दिखाएंगे!
अशा भावना व्यक्त करीत, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन आणि माजी केंद्रिय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात शेतकरी जागर मंच, उद्यापासून ‘मुंबई ते दिल्ली’ ‘गांधी शांती यात्रा’ करीत असल्याचे, शेतकरी जागर मंचचे संयोजक प्रशांत गावंडे यांनी मंगळवारी (ता.7) आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.


देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती हलाकीची असताना, केंद्र सरकार त्यावर लक्ष देण्याऐवजी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी व नागरिकत्व सुधारणा कायदा, यासारखे तत्सम विषय पुढे रेटत असल्याचा आरोप यावेळी शेतकरी जागर मंचने केला. शिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करणार आणि देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलरपर्यंत घेऊन जाणार, अशा घोषणांसह केंद्र सरकार सत्तेत आले; परंतु या दोन्ही विषयांवर सरकार दिशाहीन दिसत असल्याचे आयोजकांनी सांगितले. असे असताना, आंतरराष्ट्रीय बाजारातल्या शेतमालाच्या भावाच्या तेजी मंदीचा आम्हाला कधी फायदा होईल? केंद्राचा दुष्काळ निधी कधी मिळेल? आमच्या तरण्याबांड मुलांच्या डोक्यात भावनेच्या कोलाहलाऐवजी भविष्याचे मार्ग शोधण्याचे विचार कधी येतील? हे प्रश्न घेऊन शेतकरी जागर मंचचे कार्यकर्ते यशवंत सिंन्हा यांच्या नेतृत्वात गांधी शांती यात्रा करीत असल्याचे, प्रशांत गावंडे यांनी सांगितले. यावेळी दिनकर देशमुख, विजय शर्मा, मो.एजाज, रवी पाटील अरबट, प्रमोद उमाळे, गजानन हरणे, राजू नाईक, डॉ.दत्ता देशमुख उपस्थित होते.

सिने कलाकार, ज्येष्ठ नेते, समाजसेवकांचा सहभाग
माजी केंद्रिय अर्थमंत्री यशवंत सिन्हा याच्या नेतृत्वात काढल्या जाणाऱ्या या गांधी शांती यांत्रेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (महाराष्ट्र), माजी मुख्यमंत्री सुरेशभाई मेहता (गुजरात), शत्रुघ्न सिन्हा, अमोल पालेकर, कुमार केतकर यांचेसह देशभरातून अनेक मोठे सिने कलाकार, ज्‍येष्ठ राजकीय नेते, समाजसेवक व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करणारे हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे प्रशांत गावंडे यांनी यावेळी सांगितले.

गांधी शांती यात्रेचा मार्गक्रम
गांधी शांती यात्रेला 9 जानेवारीपासून प्रारंभ होत असून, मुंबई ते पुणे, पुणे ते नाशिक, नाशिक ते सुरत, सुरत ते बडोदा, बडोदा ते धंदुका, धंदुका ते पोरबंदर, पोरबंदर ते राजकोट, राजकोट ते अहमदाबाद, अहमदाबाद (निवास), अहमदाबाद ते उदयपूर आणि 20 जानेवारी 2020 रोजी उदयपूर ते अजमेर, असा मार्गक्रम राहणार आहे.

अकोल्यातून 50 कार्यकर्त्यांचा सहभाग
देशभरातून हजारो कार्यकर्ते या यात्रेत सहभागी होणार असून, अकोल्यामधून बुधवारी (ता.8) शेतकरी जागर मंचचे 50 कार्यकर्ते निघणार आहेत. शिवाय आयोजकांकडून कोणतेही निवेदन शासनाला सादर केले जाणार नसल्याचे प्रशांत गावंडे यांनी सांगितले.