esakal | CoronaVirus: बुलडाण्यात आणखी दोन रुग्णांना सुटी
sakal

बोलून बातमी शोधा

Buldana:Two more patients on leave hospital in Buldana

पश्‍चिम वऱ्हाडात सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या बुलडाण्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाची भीती पसरली होती. मात्र, क्वारंटाईनमध्ये असलेल्या दोन कोरोना संशयित रुग्णांना त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आज (ता.२८) सुटी देण्यात आली आहे. ही निश्‍चितच बुलडाणा जिल्ह्यासाठी समाधानाची बाब आहे. 

CoronaVirus: बुलडाण्यात आणखी दोन रुग्णांना सुटी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : पश्‍चिम वऱ्हाडात सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या बुलडाण्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाची भीती पसरली होती. मात्र, क्वारंटाईनमध्ये असलेल्या दोन कोरोना संशयित रुग्णांना त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आज (ता.२८) सुटी देण्यात आली आहे. ही निश्‍चितच बुलडाणा जिल्ह्यासाठी समाधानाची बाब आहे. 
बुलडाणा येथील एक आणि मलकापूर येथील एका कोरोना बाधिताचे अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आल्याने त्यांना येथील महिला सामान्य रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रेमचंद पंडित यावेळी उपस्थित होते. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा सहावर आला आहे. तर दुसरीकडे कामठी (नागपूर) येथील काल पॉझिटिव्ह आलेल्या तीन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही क्वारंटाईन केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.


चौदा दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर तसेच तीन वेळा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर मेडिकल प्रोटोकॉलनुसार बुलडाणा येथील एक आणि मलकापूर येथील एक अशा दोन जणांना आज स्त्री रुग्णालयातून डिस्चार्ज दिला. विशेष म्हणजे हा रुग्ण 14 एप्रिल रोजी आढळला होता. रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याची रवानगी स्त्री रुग्णालयात करण्यात आली होती.

आपल्याला रुग्णालयात आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा पुरविण्यात आल्या. यापुढे आपण नियमित काळजी घेऊ, असेही सुटी झाल्यानंतर या रुग्णांनी सांगितले. यावेळी याठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टर अधिकारी कर्मचारी व नर्सेस यांनी टाळ्या वाजवून सुट्टी झालेल्यांचे स्वागत केले.
नागपूर जिल्ह्यातील कामठी येथून बुलडाण्यात एका धार्मिक कार्यक्रमासाठी आलेले अकरा जण होते. हे सर्वजण लॉकडाऊनमुळे बुलडाण्यात अडकलेले होते. यापैकी तिघांचे रिपोर्ट काल पॉझिटिव्ह आले. इतर रुग्णांनी पोलीस प्रशासनाकडे वारंवार अर्ज करून आपल्याला घरी जाण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. त्यामुळे सहाजिकच हे सर्वजण काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे आज अशा सुमारे 39 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आल्याची माहिती देखील प्राप्त झाली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी ही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यापैकी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना शेगाव संस्थांनने उपलब्ध करून दिलेल्या सेंटरमध्ये क्वारंटाईन केले असल्याचे कळते.