Buldhana : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी दुष्टचक्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Buldhana farmers Corp damage agriculture loss

Buldhana : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी दुष्टचक्र

बुलडाणा : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी दुष्टचक्र आले असून २०३ कुटुंबाचे नुकसान झाले तर ७५ गुरे दगावली. दरम्यान जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ११४ % पाऊस आतापर्यंत झाला असून त्यात आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. आतापर्यंत अतिवृष्टीमुळे १ लाख ४ हजार हेक्ट वरील पीके खराब झाल्याचा अंदाज आहे.

खरिपामध्ये यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र त्यानंतर सततच्या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास गेला.

पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत १० दिवस जिल्ह्यात परतीचा पाऊस पडला. यामुळे खरिपाचे पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले.

जिल्हा प्रशासनाने बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले. परंतु पीक नुकसानीची माहिती ऑनलाईन देताना पीक कंपन्यांची साईट ओपन होत नसल्याने शेतकरी मेटकुटीस आला. यावर नुकसान नोंदणीसाठी प्रशासनाने ऑफलाईन पद्धतीचा अवलंब केला. मात्र बँका आणि कार्यालयाला सणानिमित्त आलेल्या सुट्ट्यामुळे या प्रक्रियेसही विलंब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची मागणी होत आहे.

१६ जणांनी गमावला जीव

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, पावसाळ्यात आतापर्यंत १५ जणांनी नैसर्गिक आपत्तीमुळे जीव गमावला आहे. १३ जणांचा वीज पडून मृत्यू झाला तर घराची भिंत पडून एकाला प्राण गमवावे लागले, पुरात वाहून दोघांचा मृत्यू झाला. या मृत व्यक्तिंपैकी २४ जणांच्या कुटुंबांना आतापर्यंत शासकीय मदत देण्यात आली.

वीज पडून गुरांचा मृत्यू

जिल्ह्यात लम्पी या आजारामुळे गुरे दगावत असतानाच वीज पडून, पुरात वाहून गेल्याने ७३ जनावरे दगावली. यात २८ दुधाळ जनावरे, शेतीमध्ये काम करणाऱ्या ३४ गुरांचा मृत्यू झाला. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले जाते.