लॉकडाउन काळात या शहरात चोरट्यांची धूम; हातातील टॉमी, कोयत्यासह एका चोराला पकडले

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 April 2020

लॉकडाउनमुळे कामधंदा नसल्याने अनेकांवर बेरोजगारी कोसळली असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उभा ठाकला आहे. तर चोरट्यांकडून या लॉकडाउनचा फायदा उचलल्या जात आहे.

मलकापूर (जि.बुलडाणा) : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. या लॉकडाउन काळात चोऱ्यांच्या व दुकाने फुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, मंगळवारी (ता.21) मध्यरात्री आठवडी बाजारातील नगर पालिका कॉम्प्लेक्समधील तब्बल चार दुकाने चोरट्यांनी फोडून त्यातील माल लंपास केल्याची घटना घडली. तर चोरीचा माल नेत असताना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्यातील एका चोरट्यास रंगेहात पकडून ताब्यात घेतले तर अन्य चोरट्यांनी हातातील टॉमी, कोयता यासह आदी शस्त्रे व काही माल टाकून पोबारा केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे. या लॉकडाउनमुळे कामधंदा नसल्याने अनेकांवर बेरोजगारी कोसळली असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उभा ठाकला आहे. तर चोरट्यांकडून या लॉकडाउनचा फायदा उचलल्या जात आहे. मंगळवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास आठवडी बाजारात असलेल्या नगर पालिकेच्या कॉम्प्लेक्समधील भाग्यलक्ष्मी पोव्हिजन, श्री एजन्सीज, जावेद चिकन सेंटर, आजम खान अ‍ॅड ब्रदर्स ही चार दुकाने चोरट्यांनी फोडली. 

आवश्‍यक वाचा - सॅनिटेशन टनलचा वापर करता, मग हे वाचाच!

या दुकानांमधून हजारो रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला. चोरलेला माल घेवून जात असताना गस्तीवरील पोलिसांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एका चोरट्यास रंगेहाथ पकडले तर इतर चोरट्यांनी पळ काढीत काही माल चारखंबा चौक परिसरात व नळगंगा नदीवरील पुलावर टाकून पोबारा केला. तर बराच माल चोरून नेण्यात चोरटे यशस्वी झाले. याचवेळी चोरट्यांनी चोरी करण्यासाठी वापरलेले टॉमी, कोयता यासह आदी शस्त्र सुद्धा फेकून दिले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास व कारवाई सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Burglary at four shops during lockdown; Caught a thief in malkapur