sanition tunel.
sanition tunel.

सॅनिटेशन टनलचा वापर करता, मग हे वाचाच !

अकोला :  कोरोना विषाणूच्या पृष्ठभूमीवर व्यक्ती किंवा समुहावर रासायनिक द्रवाची फवारणी करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर सॅनिटेशन टनल वापरले जात आहे. मात्र हे टनल आरोग्यासाठी धोकादायक असल्याने ते वापरू नये असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. डोळे आणि त्वचेसाठी रासायनिक द्रवाची फवारणी घातक असल्याने आरोग्य विभागाने सोमवारी (ता. 19) या टनला वापर न करण्याबाबत आदेशित केले आहे.

कोविड 19 विषाणूचा संसर्ग वाढल्याने रुग्णालये, शासकीय व खासगी संस्थांची कार्यालये, औषधांची दुकाने येथे मोठ्याप्रमाणावर रासायनिक द्रवाची फवारणी करणारे डोम किंवा टनल वापरले जात आहे. त्यामुळे निर्जंतुकरिण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. या उलट रासायनिक द्रवाच्या फवारणीमुळे डोळ्याला इजा होणे, त्वचेचे आजार होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे केंद्र शासनाने असे टनल वापरण्यास बंदी घालण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सोमवारी सर्व जिल्हा चिकित्सक, सर्व महानगरपालिकांचे आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पत्र पाठवून सॅनिटेशन टनलचा वापर थांबविण्याचे निर्देश दिले आहेत.


फवारणी केल्याने जंतू मरत नाही
कोरोना विषाणू हा व्यक्तीच्या शरीरावर नव्हे त्याच्या शरीराच्या आत वाढतो. त्यामुळे फवारणी केल्याने कोरोना विषाणू मरतो किंवा व्यक्ती निर्जंतूक होतो हा गैरसमज आहे.


तीव्र रसायनाचा वापर धोकादायक
केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार निर्जंतुकिरण टनलमध्ये तीव्र रसायनाचा वापर डोळ्यांना इजा पोहोचवितो. शिवाय त्वचेतून किंवा तोंडावाटे रसायनाचा अंश शरीरात गेल्यास त्याचा अपाय होऊन मळमळ होणे, पोटाचे विकार, उलटी होण्याचा धोका राहतो.


हात वारंवार धुणेच सुरक्षित
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी कोणत्याही रसायनांचा वापर करण्यापेक्षा वारंवार हात स्वच्छ धुणे, सामाजिक अलगिकरणाचे नियम काटेकोरपणे पाळणे, मास्कचा वापर करणे आणि अत्यावश्‍यक असल्याशिवाय बाहेर न पडणे याचे काटेकोर पालन केल्यानेच विषाणूचा संसर्ग टळू शकतो, असा सल्ला आरोग्य विभागातर्फे देण्यात आला आहे. त्यामुळे रासायनिक द्रवाची फावरणी करणाऱ्या कोणत्याही टनलचा वापर करण्याची शिफारस केंद्र शासन किंवा आरोग्य विभागाने केली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com