सकाळी दुकानात गेलेले किराणा व्यावसायिक संध्याकाळी घरी परतलेच नाही...मग

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 May 2020

बल्लारपुरातील सुभाष वॉर्डातील रहिवासी शिवअवतार प्रजापती यांचे कन्नमवार वॉर्डातील न्यू कॉलनी मार्गावर किराणा दुकान आहे. सोमवारी ते नेहमीप्रमाणे सकाळी दुकानात गेले. मात्र सोमवारी संध्याकाळ होऊनही ते घरी परतलेच नाही. त्यांनी दुकानातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. 4) रात्री उघडकीस आली.

चंद्रपूर : किराणा व्यावसायिकाने स्वत:च्या दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बल्लारपुरातील कन्नमवार वॉर्डात सोमवारी (ता. 4) रात्री साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. शिवअवतार प्रजापती (वय 47) असे मृत किराणा व्यावसायिकाचे नाव आहे. बल्लारपूर पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरू केला आहे. वृत्तलिहिस्तोवर त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

दुकानातच आढळले गळफास घेतलेल्या अवस्थेत

बल्लारपुरातील सुभाष वॉर्डात शिवअवतार प्रजापती हे कुटुंबीयांसह वास्तव्यास होते. कन्नमवार वॉर्डातील न्यू कॉलनी मार्गावर प्रजापती यांचे किराणा दुकान आहे. सोमवारी ते नेहमीप्रमाणे सकाळी दुकानात गेले. नित्याप्रमाणे दुपारच्या सुमारास दुकान बंद करून ते घरी येत होते.

अन्‌ मुलगा दुकानाकडे गेला

मात्र, सोमवारी संध्याकाळी ते घरी परतलेच नाही. कामाच्या व्यस्ततेत घरी आले नसावे, असा कुटुंबीयांनी अंदाज बांधला. मात्र, रात्रीचे 10 वाजल्यानंतरही ते घरी परतले नाही. त्यामुळे प्रजापती यांचा मुलगा दुकानाकडे गेला. दुकानात बघितले असता गळफास घेतलेल्या स्थितीत त्याचे वडील आढळून आले.

जाणून घ्या : Video : विलगीकरणातील नागरिकांना ग्राम पंचायत प्रशासनाने जोडले हात; कारण वाचून बसेल धक्का...

कर्जाच्या ओझ्यातूनच आत्महत्या केल्याची चर्चा

घटनेची माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनाही माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. प्रजापती यांच्यावर अनेकांचे कर्ज आहे. कर्जाच्या ओझ्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र, आत्महत्येचे खरे कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Businessman suicide in a shop at chandrapur