पैशापेक्षा माणूस मोलाचा, या व्यावसायिकाने सामाजिक जाणिवेतून दान केली जमीन...

gondpipri
gondpipri

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : व्यवसाय करताना बेरीज, वजाबाकीचे गणित मांडले जाते. पण काही सामाजिक संवेदना जोपासणारे व्यवसायापलिकडील विचार करतात. पैशापेक्षा ते माणसांची किमत करतात. भंगाराम तळोधी येथील विवेक गोनपल्लीवार हे यापैकीच एक. आपल्या आईच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या एका उपक्रमातून सामाजिक मोहीम निर्माण झाली अन्‌ बघता बघता चार हजार गरीब शेतकऱ्यांना पुनर्दृष्टी मिळाली. विशेष म्हणजे, त्यांनी रुग्णालयासाठी सव्वादोन एकर जागा दान दिली आहे.

जिल्ह्याच्या सीमेवर असणारा गोंडपिपरी तालुका. तालुक्‍यात कुठलाच उद्योग नसल्याने केवळ शेतीवरच तालुक्‍यातील 90 टक्‍के लोकांचे जीवनमान अवलंबून आहे. तालुक्‍याला लागून तेलंगणाची सीमा आहे. याच परिसरातील भंगाराम तळोधी येथे विवेक गोनपल्लीवार यांचे किराणा दुकान आहे. सोबतच त्यांची राइस मिलदेखील आहे.

शेतकऱ्यांना मदत करणारे अशी त्यांची वेगळी ओळख या भागात निर्माण झाली आहे. त्याचे कारण ठरले गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी नि:स्वार्थपणे केलेली लोकांची सेवा. गरीब वयोवृद्ध शेतकरी बांधवांना होणारा त्रास, वयोमानानुसार डोळ्यांना दिसत नसल्याने त्यांना होत असलेल्या वेदना बघत त्यांनी सुमारे बारा वर्षांपूर्वी तळोधीत विनामूल्य मोतिबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन केले.

लायन्स क्‍लब व प्रशासनातील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या संपूर्ण शिबिराचा आर्थिक भार विवेक गोनपल्लीवार यांनी उचलला. पहिल्यांदाच होत असलेल्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. समाजसेवेचे हे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांना समजले. अन्‌ मग दरवर्षीच हा उपक्रम राबवू लागले.

या उपक्रमाला आतापर्यंत अकरा वर्षे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत त्यांनी स्वत: आर्थिक सहयोग करीत परिसरातील साधारणत: चार हजार गरीब शेतकऱ्यांच्या डोळ्याच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांना चष्मेही वितरित केले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून भंगाराम तळोधी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे, ही मागणी त्यांनी रेटून धरली. वारवांर सत्ताधाऱ्यांकडे पाठपुरावाही केला. अखेर, अनेक वर्षांच्या त्यांच्या प्रयत्नांना यश आले. दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम आता प्रत्यक्षात सुरू झाले आहे. गोंडपिपरी सारख्या मागास तालुक्‍यातील चार हजार गरीब शेतकऱ्यांना पुनर्दृष्टी देऊन गोनपल्लीवार यांनी सामजिक दायित्वाचा परिचय दिला आहे.

सव्वादोन एकर जागा दान
भंगाराम तळोधी परिसरात 25 गावे येतात. या गावात आरोग्यसेवा नाही. त्यामुळे मोठीच समस्या भेडसावत होती. अनेकदा उपचाराअभावी रुग्णांचे मृत्यू झाले. अशास्थितीत गोनपल्लीवार यांनी पीएचसीची मागणी रेटून धरली. मागणी मान्य झाली पण जागेचा प्रश्‍न आला. त्यानंतर त्यांनी मुख्य मार्गावरील आपल्या स्वत:च्या मालकीची जागा प्रशासनाला दान दिली. ही जागा आजघडीला कोट्यवधी रुपयांची आहे. आता या जागेवर पिएचसीचे काम सुरू झाले आहे.

माझे वडील दरवर्षी न चुकता मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेतात. यंदा या उपक्रमाची तपपूर्ती झाली.
- गौरव गोनपल्लीवार,
भंगाराम तळोधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com