
शिक्षक मतदार संघात 35 हजार 622 शिक्षक मतदार आहेत. यापैकी विना अनुदानित शिक्षकांची संख्या तब्बल १३ हजारांवर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अनुदानाच्या आश्वासनावर जगणाऱ्या या शिक्षकांनी यावेळी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे.
अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात भविष्य आजमावणाऱ्या उमेदवारांना विना अनुदानित संस्थांमधील शिक्षकांची मते मिळवताना कठीण आव्हानांचा सामना करावा लागत आहे. विभागात या मतदारांची संख्या निवडणुकीचा निर्णय निश्चित करणार असून त्यांची मनधरणी करण्यात उमेदवारांची चांगलीच कसोटी लागत आहे.
हेही वाचा - वाघाचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाचे पथक जंगलात घालत होते गस्त; समोरचे दृष्य पाहताच...
शिक्षक मतदार संघात 35 हजार 622 शिक्षक मतदार आहेत. यापैकी विना अनुदानित शिक्षकांची संख्या तब्बल १३ हजारांवर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अनुदानाच्या आश्वासनावर जगणाऱ्या या शिक्षकांनी यावेळी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. निवडणुकीच्या आखाड्यात विद्यमान सदस्यासह 27 उमेदवार नशीब अजमावित आहेत. सरकार व शासनाकडून अनुदानाचा प्रश्न सुटलेला नाही. २० टक्के अनुदानावर या शिक्षकांना उदरनिर्वाह करावा लागत आहे. प्रत्येकवेळी अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन त्यांच्या पदरी पडत असल्याने यंदा मात्र आखडून घेण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी या मुद्द्यावर आचारसंहिता असल्याने सध्या भूमिका स्पष्ट करता येत नसल्याचे चार दिवसांपूर्वी सांगितले, तर प्रत्येक उमेदवार हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन सध्या देत आहे.
हेही वाचा - पायविहिरच्या जंगलात वाघिणीची 'एन्ट्री', पाऊलखुणांवरून पटली खात्री
पसंतीक्रमाने मतदान असल्याने विना अनुदानित शिक्षकांच्या मतांना महत्वाचे स्थान आहे. मतदार संख्या बघता या शिक्षकांच्या पंसतीक्रमावर विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. त्यांचा पसंतीक्रम मिळावा यासाठी सर्वांची धडपड सुरू आहे. किमान दुसऱ्या पसंतीचे मत मिळालेच पाहिजे यासाठी मनधरणी करण्यात येत आहे. निर्णय मात्र या शिक्षक मतदारांचा असून त्यांनी अद्याप भूमिका स्पष्ट न करता मागणी लावून धरली आहे.
हेही वाचा - बापरे! वाळू माफियांची अजब शक्कल; मध्य प्रदेशात विक्री करून त्याच वाळूची राज्यात आयात
दुसऱ्या पसंतीसाठी चढाओढ -
विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पहिल्या पसंतीच्या मतांनी पूर्ण होत नाही, असा पूर्वानुभव आहे. त्यामुळे दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीच्या मतांना महत्व आहे. पहिल्या पसंतीची मोजणी झाल्यानंतर सुरू होणाऱ्या दुसऱ्या व तिसऱ्या मतांच्या मोजणीत मते अधिक मिळावीत यासाठी प्रत्येक उमेदवार धडपडत आहे.