कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?, चक्क कपाशीच्या शेतात घेतले गांजाचे पीक

सूरज पाटील
Monday, 28 September 2020

आंध्रप्रदेश, तेलंगण सीमेला लागून असलेल्या परिसरात गांजा शेतीकडे काही शेतकऱ्यांच्या कल वाढत चालला आहे. स्वत:च्या नावावर सातबारा असणारे; तर काही लोक मक्‍त्याने शेती घेऊन सीमावर्ती भागात गांजाचे उत्पादन घेत असल्याचे बोलले जात आहे. काही वर्षांपूर्वी दारव्हा तालुक्‍यातही गांजा शेतीचा पर्दाफाश करण्यात आला होता.

यवतमाळ : शहरी व ग्रामीण भागातील नागरिक मादक पदार्थांच्या विळख्यात अडकत आहेत. चोरट्या पद्धतीने गांजाला मागणी वाढत असल्याने चक्क कपाशीच्या शेतातच आता गांजाचे पीक घेतले जात असल्याचे उघडकील आले आहे. एलसीबीच्या पथकाने केलेल्या छापेमारीमुळे गांजा उत्पादनाचा पर्दाफाश झाला.

हेरोईन, कुकीनची किमत कोटीत असते; तर गांजा हे हलक्‍या आणि कमी दर्जाचे ‘ड्रग’ मानले जाते. जिल्ह्यात आसाम, आंध्र प्रदेश, हरियाना येथून गांजाची तस्करी केली जाते. या व्यवसायात अनेक लोक गुंतले आहेत. कारवाईची प्रक्रिया किचकट असल्याने टीप मिळूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. गांजाचे व्यसन असणारे अनेक तरुणांचे पाय गुन्हेगारीत रुतल्याचे दिसून येते. अल्पवयीन मुलेही गांजाची नशा केल्यानंतर गुन्हा करीत असल्याचे उघड झाले आहे.

यवतमाळ शहरात सहज पुडीमधून गांजा उपलब्ध होतो. मोकळ्या मैदानात गांजाचा धूर सोडला जातो. मात्र, आता शेतशिवारात गांजा शेती आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. काही वर्षांपूर्वी दारव्हा तालुक्‍यातही गांजा शेतीचा पर्दाफाश करण्यात आला होता.

आंध्रप्रदेश, तेलंगण सीमेला लागून असलेल्या परिसरात गांजा शेतीकडे काही शेतकऱ्यांच्या कल वाढत चालला आहे. स्वत:च्या नावावर सातबारा असणारे; तर काही लोक मक्‍त्याने शेती घेऊन सीमावर्ती भागात गांजाचे उत्पादन घेत असल्याचे बोलले जात आहे.

अवश्य वाचा : जिल्‍हाप्रशासनाची शासनाच्या आदेशाला केराची टोपली; शेतकऱ्यांची यादीच प्रसिद्ध नाही

तीन लाखांचा हिरवा गांजा जप्त

स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण व पोलिस उपनिरीक्षक मंगेश भोयर यांनी पारवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सावरगाव (मंगी) येथील अनिल झाडे याच्या शेतातून तीन लाखांचा हिरवा गांजा जप्त केला. कपाशीची उंच वाढ होत असल्याने गांजा लागवड केल्यास दिसत नाही. पिकात दूर अंतरावर लागवड असल्यास कुणाला संशयदेखील येत नाही. गांजाचे पीक घेतल्यावर शेतातच वाळवला जाऊन दारव्हा, दिग्रस, घाटंजी, पांढरकवडा, यवतमाळ या शहरात सहज विक्री करता येते. त्यामुळे कमी खर्चात जास्त पैसा हातात पडतो. तसेच स्वत:लाही नशा करता येते. त्यामुळे काही बहाद्दरांचा कल गांजा शेती करण्याकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सामूहिक जबाबदारी

गांजाची कारवाई एकट्या पोलिस विभागाला करता येत नाही. महसूल, आरोग्य आणि पोलिस विभाग, अशी सामूहिक जबाबदारी आहे. या कारवाईत ‘रिक्‍स'असल्याचे सांगितले जाते.

जाणून घ्या : ‘नाफेड'च्या कापूस खरेदीसाठी उद्यापासून नोंदणी, शेतकऱ्यांनी घ्यावी दखल

...तर पोलिसच आरोपीच्या पिंजऱ्यात

एखाद्याने गांजाची लागवड केली. अशी माहिती मिळताच खातरजमा न करता छापा टाकल्यास त्या ठिकाणी दुसरेच पीक आढळून आल्यास पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. त्यांना शिक्षादेखील होऊ शकते. त्यामुळे गांजा शेतीची इत्थंभूत खात्री पटल्यावरच महसूल प्रशासनाला घेऊन कारवाई करावी लागते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cannabis crop grown in cotton fields