लॉकडाऊनचे कारण सांगून केले शारीरिक शोषण, लग्नाची वेळ येताच ठोकली धूम

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

सदर युवती आणि भूषण यांचे प्रेमप्रकरण सुरू झाल्यानंतर गाठीभेटी वाढत गेल्या. त्याने चार वर्षांपासून प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मोठ्या मुश्‍किलीने मार्च महिन्यात त्या दोघांचे लग्न ठरले होते. त्यापूर्वी त्यांचा साखरपुडा होणार होता. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ठरलेला साखरपुडाही रद्द झाला.

अमरावती : तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या युवतीचे भूषण दयावते या युवकासोबत सूत जुळले. त्यांच्यातील प्रेम बहरले. साखरपुडा ठरला अन्‌ कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर लग्नास नकार देऊन त्याने धूम ठोकल्याने पोलिसांनी त्याच्या विरुद्ध अखेर गुन्हा दाखल केला.

सदर युवती आणि भूषण यांचे प्रेमप्रकरण सुरू झाल्यानंतर गाठीभेटी वाढत गेल्या. त्याने चार वर्षांपासून प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मोठ्या मुश्‍किलीने मार्च महिन्यात त्या दोघांचे लग्न ठरले होते. त्यापूर्वी त्यांचा साखरपुडा होणार होता. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ठरलेला साखरपुडाही रद्द झाला.

आता प्रशासनाने लॉकडाऊनच्या अटी व शर्थी शिथिल केल्या आहेत. लग्नात सहभागी होण्याची संख्या सहावरून पन्नासपर्यंत पोचली. त्यामुळे प्रेयसीने प्रियकर व त्याच्या नातेवाईकाकडे लग्न करण्याची मागणी केली. परंतु भूषणने लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वीच धूम ठोकली. प्रियकर लग्न ठरवून फरार झाल्याची बाब प्रेयसीसह तिच्या नातेवाइकांच्या कानावर आली. त्यांनी गाडगेनगर ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी भूषण दयावते विरुद्ध अत्याचारासह प्रेयसीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. बुधवारी (ता. 24) सायंकाळपर्यंत त्याला अटक झाली नव्हती.

अवश्य वाचा- हुंडाबळी! सुनेपेक्षा कार झाली मोठी, शारीरिक व मानसिक त्रास अन्‌...

अल्पवयीन मुली, युवती किंवा एकल महिलांना फसवून त्यांचे शारीरिक मानसिक शोषण करून अर्ध्यावर त्यांना सोडून जाण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. महिला, मुलींनी आपल्या सुरक्षेला प्राधान्य देऊन तरुणांच्या जाळ्यात फसू नये, असे पोलिस, समुपदेशकांकडून वारंवार सांगितले जाते. तरी वरवरच्या दिखाव्यावर मुली भाळत असल्याने असे प्रसंग घडतात. त्यामुळे महिला, मुलींनी सजग होणे गरजेचे असल्याचे मत समजातून व्यक्‍त होत आहे.
 

आरोपीच्या अटकेसाठी प्रयत्न सुरूच
अत्याचाराशी संबंधित गुन्हा असल्याने महिला अधिकाऱ्यांकडे त्याचा तपास सोपविला. त्यात भूषणच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.
- मनीष ठाकरे, पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case of rape and cheating registered against absconding lover