
दुबईतील टी-२० क्रिकेट बुकींकडून ‘कॅश’; चाहतेच बनले सट्टेबाज
यवतमाळ - दुबई येथे सुरू असलेल्या विश्वचषक टी-20 क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजांकडून कोट्यवधींची उलाढाल होत आहे. भारत विरूद्घ पाकिस्तान या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पहिलाच सामना भारताला गमवावा लागल्याने सट्टेबाजांना कोट्यवधी रूपयांचा फटका बसला. तर, बुकी टी-20 स्पर्धा ‘कॅश’करण्यात यशस्वी झाले आहेत.
क्रिकेटप्रेमींच्या उत्साहाचा फायदा बुकींकडून घेतला जात आहे. दुबईतील क्रिकेट सामन्यामुळे सट्टेबाज व बुकी मोठ्या प्रमाणात सक्रीय झाले आहेत. सट्टेबाज बुकींच्या माध्यमातून जिल्हाभरात क्रिकेट सामन्यावर कोट्यवधी रूपयांचा सट्टा लावत आहेत. दोन वर्षांपूर्वी बुकींविरूद्घ पोलिस कारवाई होत नसल्याने ते बिनधास्त होते. मात्र, पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या रडारवर बडे बुकी येताच सर्वांचीच दाणादाण उडाली.
हेही वाचा: नरखेडात संत्रा, मोसंबी प्रक्रिया प्रकल्पाची वानवा
यवतमाळ, वणी, पांढरकवडा, पुसद या प्रमुख तालुक्यात बुकींची संख्या जास्त असून, सट्टाही कोट्यवधींच्या घरात खेळला जातो. बुकींचे नेटवर्क केवळ चारच तालुक्यात नाही तर, जिल्हाभरात स्ट्राँग आहे. यापूर्वी यवतमाळ, वणीत व विश्वचषक स्पर्धेला सुरूवात होताच पुसदमध्ये छापासत्र राबविण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात किती मोठ्या प्रमाणात क्रिकेटवर सट्टा खेळला जातो, हे दिसून येते. पूर्वी क्रिकेट हा खेळ मनोरंजन करण्यासाठी बघितल्या जात होता.
मात्र, आता अनेक सट्टेबाज व बुकींनी या खेळात शिरकाव केला आहे. अंतिम चेंडूपर्यंत क्रिकेट सामन्याची रंगत वाढत राहते. त्याचीही नशा सट्टाबाजांना चढते आणि ती नशा बुकींकडून कॅश केली जाते. क्रिकेट सुरू होण्याच्या काही वेळ आधीपासूनच संघ व खेळाडूंचे भाव ठरविले जातात. लाखो रूपयांच्या रकमेचा सट्टा बुकींच्या माध्यमातून मोबाइलद्वारेही लावला जातो. अलीकडे ऑनलाइन क्रिकेट सट्ट्यावरच भर दिला जात आहे. नाणेफेक जिंकण्यापासून क्रिकेटच्या पहिल्या चेंडूपासून ते शेवटच्या चेंडूपर्यंत हा सट्टा लावण्यात येत आहे. अनेक क्रिकेटप्रेमी क्रिकेटच्या सट्टाबाजारात फकीरही होत आहेत. पोलिसांनी बुकींविरूद्घ मोहीम उघडल्याने सध्या दबक्या आवाजात मात्र, तितक्याच जोरात सट्टाबाजार गरम आहे.
क्षणाक्षणाला उत्सुकता शिगेला
क्रिकेट सामन्यात क्षणाक्षणाला उत्सुकता शिगेला पोहचते. फलंदाज व गोलंदाजापासून प्रत्येक खेळाडूवर सट्टा लावण्यात येतो. त्यामध्ये प्रत्येक फलंदाजाच्या एकेक धावेवर तर गोलंदाजाच्या प्रत्येक विकेटवर सट्टा लावण्यात येत आहे. फलंदाज व गोलंदाजांचे दर बुकींनी वेगवेगळे ठरविलेले असतात.
Web Title: Cash From T20 Cricket Bookies In Dubai Fans Became Bookies Crime
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..