esakal | वाघाला जेरबंद करा, अन्यथा ठार मारा; शेतकरी संघटनेची वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Catch that tiger who killed farmers seek farmers association

राजुरा, विरुर तसेच लगतच्या लाठी भागात वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत दहा शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या वाघाला पकडण्यात वन विभागाला अपयश आले आहे.

वाघाला जेरबंद करा, अन्यथा ठार मारा; शेतकरी संघटनेची वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे मागणी

sakal_logo
By
प्रमोद काकडे

राजुरा (जि. चंद्रपूर)  : मध्य चांदा वनविभागाच्या राजुरा, विरुर स्टेशन वनपरिक्षेत्रात आरटी-2 या वाघाने धुमाकूळ घातला आहे. या वाघाला पकडण्यात वनविभागाला अपयश आले आहे. नागरिकांचे व त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी वाघाला ठार मारण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे केली आहे.

राजुरा, विरुर तसेच लगतच्या लाठी भागात वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत दहा शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या वाघाला पकडण्यात वन विभागाला अपयश आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी तसेच त्यांना जीविताची हमी देण्यासाठी या वाघाचा तातडीने बंदोबस्त करणे आवश्‍यक आहे. 

सविस्तर वाचा - फिरायला नेले आणि अडीच लाखांत विकले; प्रियकरानेच केली प्रेयसीची विक्री

शेती व्यवसाय व त्यावर उपजीविका असणारे शेतकरी, शेतमजूर यांनी सुरळीत शेती व्यवसाय करून पुरेसे उत्पन्न काढावे, या सर्व बाबी विचारात घेता या वाघाला तत्काळ ठार मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

राळेगाव-पांढरकवडा आणि ब्रह्मपुरी या भागात यापूर्वी परवानगी देऊन वाघाला ठार मारण्यात आले होते. वाघाच्या हल्ल्यात मृत खांबाडा येथील मारोती पेंदोर याचे मुलाला वनविभागात नोकरीत सामावून घ्यावे, अशीही मागणी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार ऍड. वामनराव चटप, प्रभाकर ढवस, आबाजी ढवस, भास्कर शिडाम, डॉ. गंगाधर बोढे यांच्यासह विरुर, विहिरगाव, खांबाडा, मूर्ती, नलफडी, सिंधी, धानोरा, कविठपेठ, बंजारागुडा, चिंचोली बु., अंतरगाव, अनुर, अमृतगुडा, सुबई, थोमापूर, पिंपळगाव, नवेगाव, नवी बेरडी, चिचबोडी, सोनुर्ली, सिर्सी, टेंबुरवाही, चुनाळा, मुंडीगेट, डोंगरगाव या गावांतील नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा - व्हॉट्सॲप ग्रुपवर कमेंट करणे जीवावर बेतले; घरात घुसून युवकाचा खून

सोमवारी रास्ता रोको आंदोलन

राजुरा : दहा शेतकऱ्यांचा जीव घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला अपयश आले आहे. त्यामुळे या क्षेत्राच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना निलंबित करावे, अन्यथा रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकरी, शेतमजूर समन्वय समितीने वनविभागाला दिला आहे. उपविभागीय वनाधिकाऱ्यांना निवेदन देताना समितीचे सदस्य चेतन जयपूरकर, मल्लेश आत्राम, भाग्यश्री आत्राम, नीलेश राऊत, सुभाष साळवे, चरणदास तोडासे, शंकर धनवलकर उपस्थित होते. वनविभागाने वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा या मागणीसाठी 12 ऑक्‍टोबरला वनविभागाच्या कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे.

संपादन - अथर्व महांकाळ