वाघानंतर आता रानडुक्‍कराचा हल्ला! नागभीडवासीयांमध्ये दहशत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

नागभीड नगपरिषदअंतर्गत येणाऱ्या नवखळा येथील शिवनगर टोली परिसरात बुधवारी (ता. 24) सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास आपापल्या कामात असलेल्या नागरिकांवर रानडुकराने गावात प्रवेश करून हल्ला केला. या हल्ल्यात तिघे जखमी झाले. वन्यप्राणी गावात शिरून हल्ले करीत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

नागभीड : नागरी वस्तींवर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. यामागच्या कारणांचा कितीही उहापोह केला तरी या घटना कमी होण्याचे नाव नाही आणि या हल्ल्यांमध्ये गरीब शेतकऱ्यांचा नाहक बळी जातो, हे मान्य करावेच लागेल. गेल्या काही दिवसात वाघाने नागभीडवासीयांना त्रस्त केले होतेच, त्यातच आता रानडुकरानेही हल्ला केल्याची घटना घडली.
नागभीड नगपरिषदअंतर्गत येणाऱ्या नवखळा येथील शिवनगर टोली परिसरात बुधवारी (ता. 24) सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास आपापल्या कामात असलेल्या नागरिकांवर रानडुकराने गावात प्रवेश करून हल्ला केला. या हल्ल्यात तिघे जखमी झाले. वन्यप्राणी गावात शिरून हल्ले करीत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. ईश्वर मनिराम जांभुळे (वय 70), जयदेव अर्जुन जांभुळे (वय 65), मुखरू कोंडू मांढरे (वय 65) अशी जखमींची नावे आहेत.
सकाळच्या सुमारास ईश्वर मनिराम जांभुळे, जयदेव अर्जुन जांभुळे व मुखरू कोंडू मांढरे हे आपापल्या घरी कामे करीत होती. अशात रानडुकराने गावात प्रवेश करून या तिघांवर हल्ला करून जखमी केले. त्यानंतर जखमींना तत्काळ ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील ईश्वर मनिराम जांभुळे हे गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले.
नागभीड तालुक्‍यातील ही सहा दिवसांतील तिसरी घटना आहे. नागभीड नगरपरिषदेअंतर्गत येणाऱ्या तुकूम येथे शेतात काम करणाऱ्या 45 वर्षीय व्यक्तीस वाघाने हल्ला करून ठार केले. दोन दिवसांपूर्वी नागभीड नारपरिषदेअंतर्गत येणाऱ्या ब्राह्मणी गावात पट्टेदार वाघाने एका शेतकऱ्यास गावात शिरून गंभीर जखमी करीत शेतातील झोपडीत मुक्काम ठोकला होता. अखेर अथक प्रयत्नानंतर वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.

सविस्तर वाचा - आता तुकाराम मुंढेंना करणार नगरसेवक बदनाम, हा घेतला निर्णय
परिसरातील अनेक गावांत बिबट, अस्वल, वाघ, डुकर व अन्य वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले आहेत. पाळीव जनावरांवर हल्ले करून ठार करण्याच्या घटना अनेकदा घडत आहेत. सध्या शेतीचा हंगाम असून, नागरिक दिवसभर शेतात असतात. वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्याच्या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. रानडुकराने हल्ला केल्याची माहिती मिळताच नवखळा बिटाचे वनपाल बोरकर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी झेप निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन नागरे, सदस्य आकाश लोनबले यांची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cattle attack on farmers