आता तुकाराम मुंढेंना नगरसेवक करणार बदनाम, हा घेतला निर्णय...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जून 2020

ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी हिटलरशाही, मगरुरी नागपूरच्या संस्कृतीत बसणार नाही, असे सुनावत आयुक्तांचे लक्ष बदलीच्या विक्रमाकडे लागले असल्याचा टोला लगावला. कधीही बदली झाली तरी कायद्याचे ज्ञान पाजूनच पाठवू, अशी शेरेबाजीही मेश्राम यांनी केले.

नागपूर : सिवेज लाइन, चेंबरच्या किरकोळ कामांच्याही फाईल्स आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रोखल्या आहेत. त्यामुळे नगरसेवकांवर नागरिकांचा रोष वाढत आहे. नगरसेवकांना बदनाम करण्याचे हे षड्‌यंत्र आहे. विकासकामे न झाल्यास रोखलेल्या फाइल्सचे फोटो काढून शहरभर होर्डिंग्ज लावण्याचा इशारा सत्ताधारी बाकावरून देण्यात आला आहे. आयुक्तांचे बदलीच्या विक्रम करण्यावर भर असल्याचे दिसते, असा टोलाही यावेळी लगावला. 

कॉंग्रेस नगरसेवक नितीन साठवणे आणि सेनेच्या नगरसेविका मंगला गवरे यांनी दिलेल्या स्थगन प्रस्तावावर चर्चेदरम्यान सर्वसाधारण सभेच्या तिसऱ्या दिवशीही सत्ताधाऱ्यांकडून आयुक्तांना लक्ष्य करण्यात आले. शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी सिवेज लाइनवरील चेंबर उघडे आहेत. मात्र, ही कामेही रोखून धरण्यात आली आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यात किंवा चेंबरमध्ये पडून एखाद्याचा मृत्यू झाला तर अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावा, अशी मागणी बंटी कुकडे यांनी सभागृहात केली.

क्लिक करा - पत्नीच्या जळत्या चितेवर पतीची उडी, सुखी जीवनाचा दुर्दैवी अंत

एकीकडे महापालिकेच्या ऍपवरील तक्रारीचा तत्काळ निपटारा केला जात आहे. त्याचवेळी नगरसेवकांचे फोनही उचलले जात नाही. तक्रारी प्रलंबित ठेवल्या जात असून, नगरसेवकांना बदनाम करण्याचे षड्‌यंत्र रचण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे रोखलेल्या फाइल्सच्या फोटो काढून आयुक्तांच्या फोटोसह होर्डिंग्ज लावणार, असा इशारा बंटी कुकडे यांनी दिला. 

ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी हिटलरशाही, मगरुरी नागपूरच्या संस्कृतीत बसणार नाही, असे सुनावत आयुक्तांचे लक्ष बदलीच्या विक्रमाकडे लागले असल्याचा टोला लगावला. कधीही बदली झाली तरी कायद्याचे ज्ञान पाजूनच पाठवू, अशी शेरेबाजीही मेश्राम यांनी केले. आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनीही मागील वर्षी 1.02 कोटीमध्ये झालेल्या नालेसफाईची चौकशी मागणी करीत यावर्षी नालेसफाईसाठी 43 लाखांची निविदा काढली असून यात इंधनाचा खर्च समाविष्ट नसल्याचे सभागृहात सांगितले. हा प्रकार नगरसेवकांची प्रतिमा मलिन करण्याचा असल्याचे ते म्हणाले. 

असे का घडले? - भीषण अपघात : ट्रकने दुचाकीस्वाराला पाचशे मिटर नेले फरफटत; अंगावरचे कपडेही...

आयुक्त आले अन्‌ निधी आटला

यापूर्वी फोन केल्यानंतर अधिकारी कामे करायचे. आता मात्र प्रत्यक्ष भेटूनही कामे होत नाही. पाच महिन्यांपूर्वी शहरात मोठ्या प्रमाणात कामे सुरू होती. मात्र, आयुक्त तुकाराम मुंढे आले आणि महापालिकेतील निधी आटला, असा टोला परिवहन समिती सभापती बाल्या बोरकर यांनी लगावला. ज्या सरकारमधील पक्षाच्या इशाऱ्यावर कामे सुरू आहे, तेही तुमचे होणार नाही, असा सावध होण्याचा सल्लाही बोरकर यांनी आयुक्तांना दिला. 

अधिकाऱ्यांची वागणूक लोकशाहीविरोधी

काही दिवसांत महापालिकेतील अधिकाऱ्यांची वागणूक लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप बसपचे मोहम्मद जमाल यांनी केला. नगरसेवकांना काहीच काम करीत नाही, अशा पद्धतीने बदनाम केले जात आहे. नगरसेवकांना उत्तर न देणारे अधिकारी त्यांच्या कर्तव्याबाबत गंभीर नसल्याचेही जमाल म्हणाले. यावेळी जमाल यांनी शायरीतून आयुक्तांवर शरसंधान साधले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hoardings to remove blocked files photos