गोंदिया जिल्ह्यातून कुठे जात होती दारू...मग पोलिसांनी...वाचा पुढे

मुनेश्‍वर कुकडे
Saturday, 25 July 2020

केशोरी येथून काही व्यक्ती चारचाकी वाहनात देशी-विदेशी दारू गडचिरोली जिल्ह्यात विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी दुपारी 2 च्या सुमारास चिचटोला शिवारात नाकाबंदी केली.

गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्‍यातील केशोरी येथून गडचिरोली जिल्ह्यात जाणारा देशी-विदेशी दारूसाठा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. ही कारवाई शुक्रवारी (ता. 24) दुपारी 2 च्या सुमारास चिचटोला शिवारात नाकाबंदी करून केली. पोलिसांनी 1 लाख 11 हजार 600 रुपयांच्या देशी-विदेशी दारूसह एकूण 4 लाख 11 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

केशोरी येथून काही व्यक्ती चारचाकी वाहनात देशी-विदेशी दारू गडचिरोली जिल्ह्यात विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी दुपारी 2 च्या सुमारास चिचटोला शिवारात नाकाबंदी केली.

या वेळी केशोरीकडून येणाऱ्या एमएच 31- सीएस 1776 क्रमांकाच्या चारचाकी वाहनाला अडवून तपासणी केली असता, डिक्की व वाहनात 33 हजार 600 रुपयांची 240 नग इंपेरिअर ब्ल्यू विदेशी दारू तसेच 78 हजार रुपयांची 3 हजार नग देशी दारू आढळली. दरम्यान, पथकाने कारवाई करून चारचाकी वाहन व देशी-विदेशी दारू असा एकूण 4 लाख 11 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

तीन आरोपींवर गुन्हा दाखल

आरोपी मधुकर बाबूराव कापसे (वय 51), कुंदन जयदेव पदा (वय 20, दोघेही रा. वडेगाव, जि. गडचिरोली) यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. या चौकशीत दोघांनीही विष्णू तक्तानी (रा. केशोरी) याचे नाव सांगितल्याने तिघांवरही केशोरी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे, अपर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक नागेश भास्कर, पोलिस उपनिरीक्षक आनंद बिजेवार, सहायक फौजदार कापगते, राऊत, पोलिस हवालदार कृपाण, देशमुख, बडे, पोलिस शिपाई बघेले, चामट, लोधी, हूड, पटले, बंडीवार, हरिणखेडे यांनी केली.

हेही वाचा : सांगा, याला रस्ता म्हणावा की चिखलाची वाट...या रस्त्याने कसा करावा प्रवास

कुडवा येथील दारू अड्ड्यावर छापा

गोंदिया : तालुक्‍याच्या कुडवा येथील अवैध दारू अड्ड्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी गुरुवारी (ता. 23) सायंकाळी साडेसहाला छापा टाकला. यात महिला आरोपी घरी अवैधरीत्या मोहफुलाची दारू व देशी दारूचा व्यवसाय करताना आढळली. दरम्यान, पोलिसांनी 90 नग देशी दारू व पाच लिटर मोहफुलाची दारू असा एकूण 2 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी महिलेविरुद्ध गोंदिया ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Caught liquor stock going to Gadchiroli district