esakal | ‘सीबीएसई’च्या पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द

बोलून बातमी शोधा

CBSSE 1st to 8th Exams canceled
  • केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली माहिती
  • नववी, अकरावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनावर
  • दहावी, बारावीच्या उर्वरित पेपरच्या वेळापत्रकाचे फेरनियोजन
‘सीबीएसई’च्या पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई)तर्फे घेण्यात येणाऱ्या पहिली ते आठवीच्या उन्हाळी परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय बुधवारी (ता.१) घेण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय मानवसंसाधन विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत मूल्यमापनानुसार शाळांतर्फे लावण्यात येणार असून, दहावी व बारावीच्या परीक्षेतील उर्वरित पेपरचे वेळापत्रकाचे परिस्थिती बघून फेरनियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यापूर्वीच २५ मार्चपासून देशभरातील सर्व शाळ-महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली. आधी ३१ मार्च व नंतर १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउनचा काळ वाढल्यामुळे सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. आता पुढील शैक्षणिक सत्रापासूनच शाळा सुरू होणार आहेत. त्यापूर्वी घेण्यात येणाऱ्या उन्हाळी परीक्षेबाबतचा निर्णय प्रलंबित होता. बुधवारी केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करून त्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली.

नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना थेट पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार नाही. त्यांची उन्हाळी परीक्षा होणार नसली तरी विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनानुसार शाळा विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्र्यांनी सांगितले. लॉकडाउनपूर्वी दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी या परीक्षा स्थगित करण्यात आल्यात. आता येत्या काही दिवसात परिस्थिती बघून दहावी-बारावीच्या उर्वरित पेपरचे सुधारित वेळापत्रक तयार केले जाईल. मात्र त्याचा निश्‍चित कालावधी नाही. परिस्थितीत बघूनच निर्णय घेतला जाणार असल्याने नेमक्या कधी परीक्षा सुरू होतील, याबाबत आताच काही स्पष्ट करता येणार नाही, असे केंद्रीय राज्यमंत्र्यांनी सांगितले.

कोरोना विषाणूमुळे देशात उद्‍भवलेल्या परिस्थितीमुळे सीबीएसईच्या परीक्षांबाबत तीन निर्णय घेण्यात आले. त्यानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रमोशन दिले जाईल. नववी, अकरावीबाबत इंटरनल असेसमेंटच्या आधारावर शाळा विद्यार्थ्यांचा निकाल देतील. दहावी व बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक परिस्थिती बघून रिसेड्युलिंग करण्यात येईल.
- संजय धोत्रे, केंद्रीय मानवसंसाधन विकास राज्यमंत्री