कापसाला हमीभाव मिळेना; शेतकरी म्हणतात सीसीआय केंद्र हवे 

रुपेश खंडारे
रविवार, 1 डिसेंबर 2019

शेतकरी बाजाराची चाचपणी करतो आहे. ज्या ठिकाणी कापूस खरेदी सुरू झाली आहे. त्या सर्वच ठिकाणी हमी भाव मिळत नसल्याचे वास्तव आहे.

पारशिवनी, (जि. नागपूर) : केंद्र सरकारचा हमीभाव पाच हजार पाचशे रुपये असताना त्यापेक्षा कमी दर व्यापारी देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. केंद्र सरकारच्या संस्थांनी कापूस खरेदी करावा व शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा अशी मागणी केली जात आहे. यासाठी सीसीआयचे केंद्र सुरू करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. 

नगदी पीक शेतकऱ्यांना पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणारा कापूस घरी पोहचला आहे. तो विकून हाती पैसा यावा यासाठी शेतकरी बाजाराची चाचपणी करतो आहे. ज्या ठिकाणी कापूस खरेदी सुरू झाली आहे. त्या सर्वच ठिकाणी हमी भाव मिळत नसल्याचे वास्तव आहे. खासगी सूत गिरण्या कापसाला 5 हजार 100 पर्यंत तर सहकारी संस्थेच्या सूत गिरण्या 5 हजार 51 पर्यंत भाव देत आहेत. खासगी व्यापारी यापेक्षाही कमी भाव देत आहेत. हा भाव साडेचार ते पाच हजारांपर्यंतच आहे. तर यामुळे थेट खरेदीदारांकडे विक्री करूनही क्विंटलमागे किमान चारशे ते पाचशे रुपयांचा तर व्यापाऱ्यांकडे सातशे ते हजार रुपयांचा तोटा शेतकऱ्यांना होत आहे. 

पहिला कापूस सर्वांत चांगला

पहिल्या वेचनीचा कापूस हा दर्जेदार असतो, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. दुसऱ्या व तिसऱ्या वेच्यात कापसाची प्रत खालावत जाते. त्यामुळे पहिल्या वेच्याच्या कापसाला चांगला भाव मिळतो. शेतकरी पहिल्या वेच्याचा कापूस विकून त्याच्यावर असलेली उघारवाडी व कर्जे फेडण्याचा प्रयत्न करतात. जर पहिल्याच कापसाला योग्य व हमीभाव मिळत नसेल तर शेतकऱ्यांचे बजेट व आर्थिक बाजू कमकुवत होते. 

व्यापाऱ्यांचा फायदा

उत्पादनासाठी काढलेले कर्ज व हातउसणे घेतलेले पैसे शेतकरी आपली गरज भागविणयासाठी माल निघाल्यावर त्याची विक्री केली जाते. याचा फायदा व्यापारी घेतात व कमी दरात मालाची खरेदी करतात. सरकारने खरेदी केल्यास मालाची योग्य भाव शेतकऱ्यांना मिळू शकतो. मात्र, शेतकऱ्यांनी आराडाओरड केल्याशिवाय सरकारी यंत्रणा जागी होत नाही. ओपन मार्केटमध्ये शेतकऱ्याची फसवणूक होत असल्याचे, शेतकऱ्यांनी सांगितले. 

परतीच्या पावसामुळे ओलावा

नागपूर जिल्ह्यात यावर्षी पावसाचे आगमन उशीरा झाले. याशिवाय पाऊस बराच लांबला व सतत बरसला. सोबतच परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व 13 तालुक्‍यात नुकसान झाले. परिणाम जमिनीत ओलावा होता. पहिला कापूस आला त्यात मोठ्या प्रमाणात ओलावा असल्याचे मत व्यापारी व्यक्त करीत आहेत. यामुळे भाव कमी मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे कापसात ओलावा असल्याच्या दाव्याला शेतकरी फेटाळत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CCI Center for the guaranteed price