esakal | कामगारच नाही, सांगा कापूस खरेदी करायचा कसा...
sakal

बोलून बातमी शोधा

cotton

जिल्ह्यात 13 केंद्रांवर कापूस खरेदी सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात 28 एप्रिलपर्यंत दोनच ठिकाणी कापूस खरेदी सुरू होऊ शकली. इतर 11 ठिकाणी कामगारांअभावी अद्याप कापूस खरेदीला सुरुवात करता आली नाही.

कामगारच नाही, सांगा कापूस खरेदी करायचा कसा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : सीसीआयतर्फे जिल्ह्यात 13 केंद्रांवर कापूस खरेदी सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात 28 एप्रिलपर्यंत दोनच ठिकाणी कापूस खरेदी सुरू होऊ शकली. इतर 11 ठिकाणी कामगारांअभावी अद्याप कापूस खरेदीला सुरुवात करता आली नाही.


शासनातर्फे शेतकऱ्यांकडील कापूस हमी भावात खरेदीसाठी सीसीआयतर्फे सुरुवात करण्यात आली होती. यावर्षी कोरोना विषाणूच्या पृष्ठभूमीवर आधीच कापूस खरेदीला उशिरा सुरुवात झाली. त्यामुळे अर्धापेक्षा अधिक कापूस शेतकऱ्यांकडे पडून आहे. त्यातच आता कामगारांअभावी कापूस संकलन केंद्र सुरू होऊ शकली नसल्याचे नवे संकट प्रशासनापुढे उभे झाले आहे. जिल्ह्यात एकूण 13 कापूस संकल केंद्राचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी अकोला तालुक्यातील चिखलगाव येथील आणि तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील कापूस खरेदीला सुरुवात झाली. इतर कापूस खरेदी केंद्र कामगार उपलब्ध न झाल्याने अद्याप सुरू होऊ शकले नाही.


दोन केंद्र आज, तर एक गुरुवारी होणार सुरू
कामगारांअभावी कापूस खरेदी रखडली असली तरी काही केंद्रांवर कामगारांचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे बुधवारपासून अकोला तालुक्यातील आपातापा आणि बाळापूर तालुक्यातील पारस येथील कापूस संकलन केंद्रावर खरेदी सुरू होत आहे. गुरुवारी (ता.30) अकोट येथे कापूस खरेदीला सुरुवात होईल. पातूर आणि बार्शीटाकळी तालुक्यातील दोन केंद्र पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती सहकार विभागातर्फे देण्यात आली.

थोड्याप्रमाणात कापूस खरेदी
अकोला जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात कामगारांच्या उपलब्धतेच्या अडचणी आल्या होत्या. त्यावर मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानुसार काही केंद्रांवर कमी संख्येने कामगार उपलब्ध होणार असल्याने बुधवारपासून दोन तर गुरुवारी एका केंद्रावर थोड्याप्रमाणात कापूस खरेदी सुरू होईल. 30 एप्रिलपर्यंत सर्व केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
- अजयकुमार, महाव्यवस्थापक, सीसीआय