शहरातील प्रत्येक गुन्ह्यावर नजर ठेवणारा तिसरा डोळा बंद; व्यवस्था पूर्ववत करण्याकरिता 42 लाख रुपयांची गरज

रुपेश खैरी
Thursday, 7 January 2021

वर्ध्यात सुमारे 80 लाख रुपये खर्च करून ही सुविधा सुरू करण्यात आली होती. यामुळे मोठ्या चौकात होत असलेली वाहतुकीची होणारी कोंडी रोखण्याचेही काम होत होते. तर शहरात होत असलेल्या मंगळसूत्र चोऱ्यांवरही यामुळे आळा बसला होता.

वर्धा : शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळीत व्हावी, चोरट्यांवर वचक बसवा याकरिता शहरातील विविध मोठ्या आणि महत्त्वाच्या चौकात सीसीटीव्ही लावण्यात आले होते. सर्व सुरळीत असताना अचानक या सीसीटीव्हीच्या कंट्रोल रूमला अचानक आग लागली. या आगीत सर्व व्यवस्था खाक झाली. आगीत भस्मसात झालेली व्यवस्था पूर्ववत करण्याकरिता 42 लाख रुपयांची गरज आहे. पण ही रक्‍कम कोण देईल असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

वर्ध्यात सुमारे 80 लाख रुपये खर्च करून ही सुविधा सुरू करण्यात आली होती. यामुळे मोठ्या चौकात होत असलेली वाहतुकीची होणारी कोंडी रोखण्याचेही काम होत होते. तर शहरात होत असलेल्या मंगळसूत्र चोऱ्यांवरही यामुळे आळा बसला होता. अनेक घडामोडींवरही यातून लक्ष ठेवण्यात येत होते. पण, मध्यंतरी ही व्यवस्था सांभाळणाऱ्या कंट्रोल रूमला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात सर्व यंत्रणा जळून खाक झाली. ती अद्याप पूर्ववत सुरू झाली नाही. 

नक्की वाचा - अनेक दिवसांपासून बंद असलेल्या घराचं शेजाऱ्यांनी उघडलं दार; पलंगाजवळील दृश्य बघून भल्याभल्यांचा उडाला थरकाप 

जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयातून कार्यान्वित होणारी ही यंत्रणा पूर्ववत होण्याकरिता नव्याने 42 लाख रुपयांचा खर्च आहे. आगीत भस्मसात झालेली सर्वच व्यवस्था सुरळीत करण्याकरिता हा निधी आणावा कुठून असा प्रश्‍न पोलिस विभागाला पडला आहे. जिल्हा नियोजन विभागातून पैशाची मागणी करण्यात आली असता तिथे निधी नसल्याचे सांगण्यात आल्याचे पोलिस विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. अशा स्थितीत शहरातील हा तिसरा डोळा आणखी किती दिवस बंद राहणार हे सांगणे सध्या कठीण आहे. नागरिकांच्या सुरक्षेकरिता ही व्यवस्था पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. 

आमदारांनी केली पालकमंत्र्यांकडे मागणी 

शहरातील सीसीटिव्ही बंद असल्याने ती सेवा पूर्ववत करण्याची मागणी वर्ध्याचे आमदार डॉ. पंकज भोयर यांनी पालकमंत्री सुनील केदार यांना निवेदनाद्वारे केली होती. त्यांनी यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले होते. याला बराच कालावधी लोटला तरी अद्याप कुठलाही तोडगा निघाला नाही. 

जाणून घ्या - 'त्या' चौघांचे मृतदेह बघून आई-वडिलांनी फोडला टाहो; हिवरा-हिवरी गावात पसरली शोककळा; सरपंचांनाही अनावर झाले अश्रू

शहरात वाढताहेत दुचाकी चोरीच्या घटना 

शहरात गत काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढत आहेत. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याने यात चोरट्यांचे फावत आहे. यावर वचक बसविण्यासाठी या तिसऱ्या डोळ्याची गरज आहे. येत्या दिवसात महिलांचा मकर संक्रात हा सण येत आहे. याकाळात महिला घराबाहेर पडणार असून मंगळसूत्र लांबविण्याच्या घटना घडण्याची शक्‍यता आहे. यावर आळा घालण्यासाठी हा तिसरा डोळा तत्काळ सुरू करण्याची मागणी होत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CCTVs in Wardha City off from last 1 year Latest News