
अवकाळी पावसाने आधीच कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बोंडे सडून गेली आहेत. हे संकट जात नाही, तोच गुलाबी बोंडअळीने मोठ्या प्रमाणात आक्रमण केले.
मारेगाव (जि. यवतमाळ) : कपाशी पिकावर बोंडसड व गुलाबी बोंडअळीने आक्रमण केले. त्यामुळे कपाशी पीक उद्ध्वस्त झाले. केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे संचालक वाय. जी प्रसाद यांनी आपल्या पथकासह मारेगाव येथे भेट देत पिकांची पाहणी केली.
अवकाळी पावसाने आधीच कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बोंडे सडून गेली आहेत. हे संकट जात नाही, तोच गुलाबी बोंडअळीने मोठ्या प्रमाणात आक्रमण केले. त्यामुळे 31 हजार 638 हेक्टर क्षेत्रामधील कपाशी बाधित झाली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागात सर्वाधिक कपाशीचे उत्पादन घेतले जाते.
लांब धाग्याच्या कपाशीमुळे मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सुरुवातीला कपाशीचे अतिशय चांगले पीक होते. परंतु, सप्टेंबर व आक्टोबर महिन्यांच्या सुरुवातीच्या झालेल्या परतीच्या सततच्या पावसामुळे कपाशीची वाट लागली. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या चमूने बोटोनी येथील शेतकरी बाळाभाऊ पाटील यांच्या शेतात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. शिवाय यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, उपविभागीय कृषी अधिकारी जे. आर. राठोड, कीटकशास्त्रज्ञ डॉ. व्ही. चिंनाबाबू नाईक, डॉ. दीपक नगराळे, कृषी अधिकारी आर. डी. पिंपरखेडे कृषी अधिकारी, ए. एम. बदखल, एस. के. निकाळजे, ए. एस. बरडे आदी उपस्थित होते.
संपादन - अथर्व महांकाळ