चामोर्शी-हरणघाट मार्गाच्या दुरुस्ती करणार तरी कधी? ठिकठिकाणी खड्डे असल्याने नागरिकांचा त्रास वाढला

अमित साखरे
Tuesday, 10 November 2020

या रस्त्याच्या मधोमध नाल्या तयार झाल्या आहेत. रस्ता आधीच खराब असून संपूर्ण रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. त्यात गेल्या पावसाच्या पाण्याने हा रस्ता आणखी खराब झाला आहे.

चामोर्शी (जि. नागपूर) : तालुक्‍यातील चामोर्शी - हरणघाटमार्गे मूलकडे जाणारा मार्ग दयनीय अवस्थेत असून या मार्गाची दुरुस्ती करणार, तरी कधी, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

या रस्त्याच्या मधोमध नाल्या तयार झाल्या आहेत. रस्ता आधीच खराब असून संपूर्ण रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. त्यात गेल्या पावसाच्या पाण्याने हा रस्ता आणखी खराब झाला आहे. त्यामुळे नियमितपणे या रस्त्यावर वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्याच्या धुळीमुळे प्रवाशांना श्‍वसनाचा त्रास होत आहे. त्यामुळे चामोर्शी-हरणघाट रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे. 

अधिक माहितीसाठी - हायवेने प्रवास करीत असाल तर दंडाचे पाचशे रुपये जवळ ठेवा!

चामोर्शी-हरणघाट मार्गावर मोठ -मोठे खड्डे, तर आहेतच पण बारीक गिट्टी, चुरी, डागडुजीच्या वेळेस टाकलेली माती रस्त्यावर असल्यामुळे रात्रीच्या सुमारास वाहनधारकांना धुळीमुळे वाहन कठीण होते. त्यामुळे अपघात होण्याचीही शक्‍यता बळावली आहे. तसेच या धुळीमुळे अनेकांना श्‍वसनाचा त्राससुद्धा निर्माण झाला आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीमध्ये कोरोनाच्या एक लक्षणांपैकी श्‍वसनाचा त्रास हे एक लक्षण असल्यामुळे अनेक वाहनधारकांना आता याची भीती वाटायला लागली आहे. 

अनेक वर्षांपासूनची या परिसरातील नागरिकांची हा रस्ता पूर्णपणे दुरुस्त करावा, अशी मागणी आहे. पण ही मागणी अद्याप पूर्ण झाली नाही. पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे पडले असता काही प्रमाणात या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. पण तेव्हापासून आतापर्यंत लक्ष देण्यात आले नाही. या परिसरातील जवळपास सर्वच रस्ते खराब झाल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणच्या रस्त्यावर डांबर उखडून खडी रस्त्यात पसरली आहे. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांचे वाहन असंतुलित होऊन अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.

 तसेच मागील महिन्यातील अवकाळी पावसाने रस्त्याच्या कडेला चिखल जमा झाला होता. पण ते चिखल आता वाळल्याने त्याला नालीचे रूप आले आहे. याचाही भयंकर त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.

सविस्तर वाचा - टूथपेस्ट'वरील रंगीत पट्ट्यांचा अर्थ तरी काय?

बांधकाम विभाग ढिम्म

नागरिक अनेक महिन्यांपासून ही समस्या सहन करत असून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करत आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग ढिम्म असून या मागणीकडे अजिबात लक्ष देत नाही. येथील लोकप्रतिनिधीसुद्धा या समस्येकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत असून या रस्त्याची दुरुस्ती तत्काळ करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

 
संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chamorshi hranghat highway is in bad condition in gadchiroli